पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाठक सरांना डायरी लिहायचा विलक्षण छंद. कोणाचा वाढदिवस म्हटलं की सर न चुकता नारळ घेऊन दारात उभे! सरांनी गेल्या ३५ वर्षांत अनेक शिक्षक सहका-यांचेच काय, पण माझ्यासारख्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस व्रतस्थपणे साजरे केले! पण सरांचा वाढदिवस कोणी साजरा केल्याचे आठवत नाही.
 पाठक सर म्हणजे एक प्रयोगशील शिक्षक, सतत नवनवे प्रकल्प, छंद त्यांनी जोपासले नि रुजवले. भारतीय भाषांतील विविध गाणी सामूहिकपणे बसविण्याचे त्यांचे कसब आज ‘भारतीयम्' रूपात अवतरलेय! कबड्डी, खो-खो, लेझीम, डम्बेल्स, चुंगरू, काठी, झेंडा ड्रिल असे किती तरी प्रकार सर बंगालमध्ये शिकून आले नि सतत शिकवित राहिले.
 पाठक सर आज निवृत्त होत आहेत; पण ते माझ्यापेक्षा तरुण दिसताहेत. शरीर नि मनाची प्रच्छन्न प्रसन्नता लाभलेलं हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व ‘आंतरभारती'त मात्र उपेक्षित राहिलं. पिकतं तिथं विकत नसतं हेच खरं! सरांनी पुढे मराठीचे शिक्षक म्हणून आपला असा ठसा उमटविला. बोडत श्रेणीत प्राधान्यक्रमाने उत्तीर्ण होणारे अनेक विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय पाठक सरांना देताना दिसतात. पूर्वीची ‘आंतरभारती' एक ध्येयवादी संस्था होती. व्यापार पेठेत वाढलेल्या या शाळेस देवाण-घेवाण करणाच्या पेढीचं रूप आलं ही शोकांतिकाच नव्हे का? घेण्याची सवय लागलेल्या आंतरभारती'ने शिक्षण संस्था म्हणून आपल्या पहिल्या शिक्षकास निरोप दिला नाही, हे त्याचं ठळक उदाहरण! शिक्षकाचं अढळपद विद्याथ्र्यांच्या हृदयात कोरलेलं असतं. मला खात्री आहे की, आज सरांचा सन्मान शेकडो विद्यार्थी त्यांना घरी जाऊन शुभेच्छा देऊन करतील.
 पाठक सर एक प्रवृत्त रसायन होय. निवृत्ती त्यांच्या प्रकृतीस मानवणारी नाही. त्यांनी बोर्डातील मुलांना मराठी शिकवित राहायचा संकल्प केला आहे. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे ते बालकल्याण संकुलातील मुलांना आजन्म मोफत शिकवित राहणार आहेत. त्यांच्या निवृत्तीचा हा विधायक नि उन्नायक संकल्प त्यांच्याविषयीचा आदर वर्धिष्णू करणारा आहे. पाठक सरांच्या निवृत्तीने मला एका गोष्टीची खंत वाटते आहे... ती खरं तर साच्या समाजाची खंत ठरावी... सरांच्या निवृत्तीने एका ध्येयवादी परंपरेचा अंत होतोय... माझ्यासारख्या शिक्षक झालेल्या विद्याथ्र्यांची जबाबदारी वाढली आहे... ध्येयवाद जोपासण्याची टिकविण्याची...


माझे सांगाती/७७