पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/70

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आठवतं, काही वर्षांपूर्वी काही मंडळीनी कोल्हापुरात महायज्ञाचा घाट घातला होता. त्याला येथील सर्व पुरोगामी विचारांच्या व्यक्ती, संस्था व संघटनांनी विरोध करायचा ठरविले. त्याची एक जाहीर सभा बिंदू चौकात योजली होती. त्यांचे अध्यक्षपद छत्रपती शाहू महाराजांनी स्वीकारावे म्हणून आम्ही विनंती करण्यासाठी वाड्यावर जायचे ठरविले. जातानाच रिकाम्या हातांनी व नकारानि परतायचं नाही ठरवून मी कॉम्रेड पानसरे व डॉ. जयसिंगराव पवार यांना घेऊन गेलो. प्रस्ताव ठेवला. छत्रपती शाहू महाराज एकच वाक्य बोलले. डॉ. जयसिंगराव पवार आलेत. चर्चेचा प्रश्नच नाही. तसे ते सभेत आले. सभा रात्री उशिरापर्यंत चालली; पण छत्रपती चुळबूळ न करता बसून होते. अध्यक्षीय भाषणही त्यांनी केले व आमचे आंदोलन यशस्वी झाले.

 क्रमिक पुस्तकांचे लेखक म्हणून ते विद्यार्थ्यांत प्रिय आहेत. त्यांच्या सर्वच ग्रंथांच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित होणं हे त्यांच्या लेखकाचं लौकिक यश होय. त्यांच्या पीएच. डी.च्या प्रबंधावर आधारित ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम' ग्रंथ मी पाहिला नाही. पण मूळ प्रबंध एकदा विद्यापीठात काही संदर्भाच्या अनुषंगाने पाहिल्याचे आठवते. The Maratha State Under Chatrapati Rajaram असं काहीसं नाव होतं; पण छत्रपती राजाराम महाराजांचे जीवन, चरित्र, कार्य यांचा त्यातील समन्वय शास्त्रीय होताच; पण त्याला भक्कम पुरावे देत ते मांडल्याने त्या संशोधन कार्याचा पाया मजबूत असल्याचे त्या वेळी जाणवले होते. त्यांच्या ग्रंथांना मिळालेले पुरस्कार तर अनेक, पण ‘अखिल भारतीय इतिहास परिषद'च्या वतीने त्यांनी योजलेली अधिवेशने चर्चेच्या अंगाने उजवी असत. राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ' त्यांनी कन्नड, तेलुगू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, आदी भाषांत भाषांतरित करून घेण्यात जी चिकाटी दाखविली, त्याचा मी जवळचा साक्षीदार आहे. संयमित सातत्य शिकावे ते डॉ. जयसिंगराव पवार यांच्याकडून हा त्यांचा वसा प्रा. डॉ. मंजूश्री पवार चालवित आहेत. याचाही मला विशेष आनंद व अभिमान आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अमृतमहोत्सव प्रसंगी त्यांचे शुभचिंतन करण्यात सुहृद म्हणून हर्ष आहेच; पण त्यांनी व्यक्तिगत जीवनात जी मूल्ये जपली त्यांचा अभिमान अधिक आहे. अगदी अलीकडेच त्यांनी आपले गुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या नावाने मोठा पुरस्कार सुरू केला. तो उपक्रम गुरूविषयीची कृतज्ञता म्हणून त्यांनी सुसंस्कृतता व्यक्त करणारा ठरतो.

माझे सांगाती/६९