पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीवन व कार्य महत्त्वाचे वाटते. मोहनराव लाटकर हॉटेल व्यावसायिक; पण सामाजिक कार्यात भूमिगत सहभाग. आयुष्यभर काही माणसं प्रसिद्धिपराङ्मुख राहतात, यावर आज कुणाचा विश्वास बसणार नाही. मोहनराव डकरे म्हणजे स्वामिनिष्ठेचा मेरूमणी. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी विकासाची गंगा घरोघरी वाहती केली. त्यांच्या वारशाचे जतन मोहनराव ज्या अविचल प्रेमाने करतात, त्याला तोड नाही. ही माणसं सार्वजनिक समाजपुरुष म्हणून जगत राहतात. आपलं समाजस्वास्थ्य जपणारी ही मंडळी व्यक्तिगत संसाराकडे दुर्लक्ष करून समाजाचा पसारा सावरत असतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
 ‘माझे सांगाती'मधील प्रत्येक व्यक्तीत तुम्हास स्वत:पलीकडे पाहण्याची वृत्ती दिसेल. साहित्य, आरोग्य, शेती, उद्योग अशा जीवनातील विविध क्षेत्रांतील ही मंडळी. त्यांनी आपापल्या क्षेत्रात नवनवे प्रयोग केले. सेवेचे नवे पायंडे पाडले. एखादा विषय जिव्हाळ्याचा बनवून आयुष्यभर त्याची पाठराखण केली. या निरंतरतेतूनही परिवर्तन घडत गेले. शिवाय यांचे जीवन एकारलेले नव्हते. जीवनाच्या विविध गरजांमध्ये आपला खारीचा वाटा, इतक्या माफक सहभागाने त्यांनी जो समाजबदल घडवून आणला, त्यामागे मुंगीची क्षमता असली तरी हत्तीच्या रूपात कार्य बळ उभारले गेले. बाबूराव शिरसाट साधे आरोग्य खात्यातील पर्यवेक्षक; पण लिहिण्याच्या कलेने त्यांनी आपली नोकरी, तीही सरकारी असून तिला प्रबोधनाचे साधन बनविले. प्रतिबद्ध माणसेच असं करू शकतात. मी शहरात स्कूटरवरून फिरत असतो. अकारण भोंगा वाजवत दुचाकी दौडणारे स्वार आजूबाजूला गलका करीत असतात. मी भोंगा न वाजविता माझी दुचाकी हाकतो. आवाजाच्या प्रदूषणात भर न घालण्याचा माझा कृतसंकल्प समस्येस अबोल उत्तर नि रचनात्मक पर्यायच असतो. असा पावलापुरता प्रकाश घेऊन फिरलो तरी आसमंत हळूहळू उजळत राहतो. साहित्यिक वसंत केशव पाटील काया, वाचा, मने त्यांना जे पटते ते व्यक्त नि रूपांतरित करीत राहतात. अनिल मेहतांनी तर किती नवोदितांना लिहिता लेखक बनविले. डॉ. जयसिंगराव पवारांनी इतिहासपुरुषांना पुनर्मूल्यांकनाने न्याय मिळवून दिला.
 प्रा. मंदाकिनी खांडेकर या वि. स. खांडेकरांच्या ज्येष्ठ कन्या. आपल्या ज्येष्ठत्वाच्या जबाबदारीने प्रसंगी जोखीम स्वीकारून वडिलांचं अक्षर-अक्षर