पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/61

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


व समोरच्याचा आदर, सन्मान करणारं असायचं. ड्रायव्हरनं घर बांधलं तर त्याच्या वास्तुशांतीला हजर! मित्रांनी चहाला बोलावलं तर मिठाईचा पुडा घेऊन स्वारी दत्त! असं लाघवी व्यक्तिमत्त्व! पण त्यांनी आपला प्रशासक कधी मरू दिला नाही. आसामी कितीही राजकारणी, पोहोचलेला असू दे गैर करणं त्यांनी निक्षून टाळलं. प्रसंगी कटुता घेऊन सामान्यांसाठी त्यांच्या न्यायाचा तराजू सतत झुकलेलाच मी पाहिला. तीन वर्षांच्या त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यकालात जिल्ह्यात एकदाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला असं झालं नाही. ते उपजिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, (जि. प.), संचालक (क्रीडा) आयुक्त, महानगरपालिका, वखार महामंडळ, चित्रपटनगरी अशी बहुविध पदं त्यांनी भूषविली असल्याने व अमेरिकेत जाऊन व्यवस्थापनाचे धडे घेतले असल्याने प्रश्न निर्माण होण्यापूर्वी सोडवायचं त्यांचं कौशल्य अनुकरणीय होतं.
 त्यांचा स्वत:चा मोठा ग्रंथसंग्रह होता. गावात ग्रंथप्रदर्शन असो, त्यांची चक्कर व खरेदी ठरलेली. त्यांच्या कार्यकाळात आम्ही कोल्हापुरात ‘राजर्षी शाहू ग्रंथमहोत्सव' सुरू केला. ते उद्घाटक म्हणून आले आणि त्यांनी राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टच्या ग्रंथालयासाठी एक लक्ष रुपयांची पुस्तकखरेदी केली. तीपण स्वतः सर्व स्टॉल्सवर फिरून, निवडून. या ग्रंथमहोत्सवासाठी त्यांनी ‘महोत्सव गीत' उत्स्फूर्तपणे लिहून दिलं. अनेक कार्यक्रमांना त्यांना प्रेक्षकात बसून मनमुराद आनंद लुटताना पाहणं. कोल्हापूरकरांच्या अंगवळणी पडून गेलं होतं. कुणीही जावं, विनंती करावी व त्यांनी कार्यक्रमाला यावं असे ते खरे ‘जनप्रिय जिल्हाधिकारी' बनले होते. आम्ही एक व्याख्यानमाला चालवायचो. त्याचे उद्घाटक म्हणून यावं म्हणून आम्ही विनंती करायला गेलो, ते तयार झाले; पण एका अटीवर... 'मी उद्घाटन करणार; पण एका विषयावर व्याख्यान देणार...' अशी त्यांची मनस्विता असायची.

 कोल्हापूरचा 'राजर्षी शाहू स्मारक ट्रस्ट' म्हणजे जिल्ह्याचं सांस्कृतिक केंद्र. जिल्हाधिकारी त्याचे पदसिद्ध अध्यक्ष. त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकालात या स्मारकाचा लक्ष्मीकांत देशमुख यांनी अक्षरशः कायापालट केला. सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उभारून स्मारकभवनाचा विस्तार केला. कलादालन सभागृह विस्तार, मिनी थिएटर, वातानुकूलन अतिथिगृह विस्तार व सुविधा संपन्न करणे, ग्रंथालय सक्रिय करणे, स्मृतिचित्र निर्मिती, वेशभूषा कक्ष, प्रसाधनगृह, इत्यादी सोई केल्या. उपक्रमांची रेलचेल केली. ट्रस्टतर्फे ‘युवा गौरव' पुरस्कार, विविध मंच स्थापना, जिल्हा साहित्य संमेलन, व्याख्याने, नवलेखक शिबिर, साधना कथा संमेलन, रवींद्रनाथ जन्मशताब्दी, साहित्यिक

माझे सांगाती/६0