पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/6

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


ज्यादा' असाच त्यांचा व्यवहार रहात आल्याने आमच्या पिढीसाठी ही मंडळी अनुकरणीय व आदर्शच राहिली. हे सांगाती म्हणजे मित्र, सोबती नव्हेत तर ज्यांच्या प्रभावक्षेत्रा-छत्राखाली आम्ही वाढलो, अशी ही मंडळी. काही मित्र, स्नेहीही यांत आहेत; पण ती माझ्या वाटेवरून चालणारी म्हणून आत्मीय वाटली. उपचार, ओझे, उपकृतता अशा कारणांनी हे लेखन घडलेले नाही. केवळ लागेबांधे निभावायचे म्हणून कुणाची भलावण केलेली नाही. आत्मकेंद्रित, स्वार्थी, उपद्व्यापी माणसांबद्दल मला लिहायलाच होत नाही. अशांकडे दुर्लक्ष हाच त्यांना दिलेला सामाजिक विजनवास होय. लुडबुड म्हणजे सामाजिक काम नव्हे. त्यामागे खरी निरपेक्षता असते पदवैराग्याची! 'तुम भले, हम भले', ‘तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा' अशी माणसं समाजात अधिक.
 प्रसिद्धीकडे डोळा ठेवून, पदासाठी गळ टाकून काम करणारी मंडळी आव कितीही आणोत; त्यांची कसोटी येते ती निरपेक्ष निर्णयक्षणी. तिथं त्या मर्मावर ही मंडळी हारतात. अशा मंडळींचं पण एक अघोषित संगठन, कार्यक्रम ठरलेला असतो. समान रंगाचे पक्षी एकत्र येतात, तसे यांचे थवे तुम्हाला समाजात आढळतील. त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो. येणकेण प्रकारेण आपली सद्दी चालू ठेवायची. यांचे सख्य कारणपरत्वे बदलू शकते. सरड्याचा रंग लेऊन जन्मलेली ही जमात गनिमी कावे, भूमिगत अपप्रचार, इत्यादीमार्गे समाजाच्या कानांत हॅम्लेट', 'ऑथेल्लो' नाटकांतील पात्रांप्रमाणे गरळ ओतायचे, ओकायचे काम न थकता करीत राहतात. अशी कारस्थाने करणा-या या मंडळींवर आगपाखड करीत राहण्यापेक्षा 'माझे सांगाती'मधील व्यक्तींच्या गुण नि वृत्तीचा सकारात्मक, अनुकरणीय पर्याय देण्यातच समाजहित सामावलेले असते, या विचारावरील विश्वासातून सदरचे लेखन घडले आहे.
 केशवराव जगदाळे हे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते. कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत राहणारे विजार, सदच्यातील हे कार्यकर्ते, कोल्हापूरचे नगराध्यक्ष झाले तरी ना पोशाख बदलला, ना हातातली सायकल गेली. एवढी साधी गोष्ट पण आजच्या पिढीस बरेच काही सांगून जाईल. अॅड. के. ए. कापसे म्हणजे सार्वजनिक पैशाला स्पर्श न करता मोठे होता येते या विश्वासाचा वस्तुपाठ. शिवाय व्यवसायनिष्ठा तितकीच उच्च कोटीची. प्राचार्य अमरसिंह राणे माझे शिक्षकच. विद्यार्थ्यांबद्दल शिक्षक मनाच्या उदारतेचे प्रतीक म्हणून मला त्यांचे