पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

औपचारिकपणे पाहत असतात. लक्ष्मीकांत देशमुख यांनी या साच्या जबाबदाच्या येथील कार्यकालात कर्तव्य म्हणून स्वीकारल्या. 'बालकल्याण संकुल' ही अनाथ मुले, मुली व महिलांचे संगोपन, शिक्षण, सुसंस्कार, पुनर्वसन कार्य करणारी संस्था. त्या संस्थेला ते पदभार स्वीकारताना कर्ज होतं. ते तर त्यांनी फेडलंच; शिवाय एक कोटी रुपयांचा निधीही जमा करून दिला. त्या निधी संकलनाचंही मोठं वैशिष्ट्य सांगता येईल. त्यांनी निधी संकलनार्थ दैनिक 'पुढारी'चे संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. निधी संकलनाच्या शुभारंभाची बैठक योजली. बैठकीस उद्योगपती, व्यापारी, साखर कारखान्यांचे चेअरमन, आदींना व्यक्तिगत पत्र लिहून सादर निमंत्रित केलं. सभेचे निमंत्रक म्हणून स्वागतपर भाषण करून संस्थेची अडचण विशद केली. स्वत:चा एकावन्न हजार रुपये देणगीचा चेक अध्यक्षांकडे सुपूर्द केला. ‘आधी केले नि मग सांगितले' असा शिरस्ता त्यांनी ठेवल्याने सभेतच लक्ष्यपूर्ती झाली. ते नावाचे लक्ष्मीकांत नव्हेत, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं होतं.
 बालकल्याण संकुलात लहानाच्या मोठ्या झालेल्या मुलींची संस्था लग्न करून देते. एका लग्नासाठी संस्थेनं त्यांना कन्यादानासाठी सपत्निक आमंत्रित केलं. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘मला मुलगी नाही. ही माझी मुलगी समजून मी माझ्या घरी तिचं लग्न करून देणार. लक्ष्मीकांत देशमुख यांनी मुलीचा पिता म्हणून घरोघरी पत्रिका वाटल्या. सर्वांना कोल्हापुरी फेटे बांधले. पोलीस बँड, हळद, वरात, मांडव, बुंदीचं जेवण, फटाके अन् हे सर्व पदरमोड करून. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी निवासाच्या इतिहासातील हे पहिलं शाही लग्न एका वंचित बालिकेचं! असं करायला तुमची जात कळवळ्याचीच असायला लागते. हे येरागबाळ्याचं काम नव्हतं.

 नसीमा हुरजूक, प्रा. साधना झाडबुके, पी. डी. देशपांडे, अशोक रोकडे, शिवाजी पाटोळे, कांचनताई परुळेकर, स्मिता कुलकर्णी, पवन खेबुडकर, साताप्पा कांबळे, अनुराधा भोसले, प्रमिला जरग, इत्यादी मंडळी कोल्हापूर जिल्ह्यात वंचितांची विविध प्रकारची समाजकल्याण कार्ये करतात. तशा अर्थांनी राजर्षी शाहूंनी निर्माण केलेल्या परंपरेमुळे कोल्हापूर जिल्हाभर वंचितांच्या संस्थाश्रयी व संस्थाबाह्य समाजकार्याचं जाळं आहे. या सर्व संस्थापैकी हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड, अवनि, स्वयंसिद्धा, जीवनमुक्ती, रेडक्रॉस सोसायटी, जिज्ञासा, चेतना, चैतन्य, अंधशाळा, देवदासी वसतिगृह, मूकबधिर विद्यालये, आश्रमशाळा, साखरशाळा, बालमजूर शाळा, महिला आधारगृह, श्रमिक महिला वसतिगृहे यांचे कोणतेही प्रश्न असोत; लक्ष्मीकांत देशमुख यांनी आश्वासन देऊन बोळवण केली असं अपवादानंही घडलं नाही. दलित,

माझे सांगाती/५८