पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामाजिक प्रशासक : लक्ष्मीकांत देशमुख

 तो सन २००९ चा प्रारंभकाळ असावा. तो दिवस लक्ष्मीकांत देशमुख यांचा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदग्रहणाचा पहिला दिवस होता. सकाळी स्थानिक वृत्तपत्रांतून त्यांच्या सविस्तर मुलाखती छापून आल्या होत्या. मी सकाळी त्या लक्षपूर्वक वाचल्या होत्या. त्या वाचीत असताना एक गोष्ट लक्षात आली होती की, कोल्हापूरला यायचे ठरल्यावर त्यांनी भरपूर होमवर्क केलं होतं. जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ही पहिलीच नियुक्ती होती. मोठ्ठी उमेद व उत्साह घेऊन ते येत असल्याचं मुलाखतीत प्रतिबिंबित झालं होतं. त्या दिवशी श्रमिक प्रतिष्ठानचा एक साहित्यिक सत्काराचा कार्यक्रम आम्ही आमच्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनात योजला होता. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही वेळेतच लक्ष्मीकांत देशमुख प्रेक्षकांत येऊन बसल्याचे कुणीतरी कार्यकत्र्यांनी येऊन सांगितले. आम्ही व्यासपीठावर त्यांना आमंत्रित केल्यावर मी ‘श्रोता' म्हणून आल्याचं ठामपणे सांगून मोठ्या नम्रतेनं, विनयानं स्टेजवर यायचं त्यांनी नाकारलं होतं. इतकंच नव्हे तर समारंभ संपल्यावर स्टेजवर येऊन आम्हा सर्व साहित्यिकांचे अभिनंदन केलं होतं. त्या वेळी त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांचे साहित्यप्रेम, जाण, अभ्यास लक्षात आला. एक रुजू, विनयशील व्यक्ती म्हणून माझ्या मनी झालेली त्या वेळेची नोंद रोज दृढमूल होते आहे.

 कोल्हापूरचे जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटना व समित्यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. अनेक सनदी अधिकारी या जबाबदारीकडे


माझे सांगाती/५७