पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/54

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


भागात जन्म, शिक्षण व व्यवसायाची हयात गेल्याने गावपंढरीचे सारे गुणअवगुण कसे मातीतून आलेले... अस्सल, रांगडे. नावातच पाटीलकी असल्याने वसंतरावांचं एकूणच व्यक्तिमत्त्व म्हणजे 'शिवबा ताठ!' आम्ही दोघेही उंच, शिडशिडीत; पण जमीन-अस्मानाचं अंतर! या शिडात कायम वारं भरलेलं; त्यामुळे हे तारू कायमच भरकटलेलं मी अनुभवलं. ते प्रत्यक्षात नॉर्मल असले तरी अंतर्मनात कोणत्या तरी वाचलेल्या साहित्यकृतीचा पिंगा फेर धरून असायचा अन् अंतर्मनात किंकर्तव्यविमूढ असा धिंगाणा. ते गावाकडचे पाटील असले तरी भाषा मात्र कुलकण्र्यांची. शुद्ध, घरंदाज; पण अभिव्यक्तीत एक प्रकारचा रासवटपणा, कटुता आपसूक यायची.
 त्यांचं हे असं का व्हायचं याचा मी जेव्हा विचार करू लागतो, तेव्हा लक्षात यायचं त्यांचं उद्ध्वस्तपण. ऐन उमेदीतील त्यांचा मुलगा... घास हातीतोंडी आलेला असताना हिरावला गेला होता. तेव्हा कठोर वसंतरावांतील हळवा कवी, संवेदनशील बाप, करुण शिक्षक मी जवळून अनुभवला आहे.
 वसंतराव नेहमी भेटतात सांगलीत. तेही कोणत्या ना कोणत्या साहित्यिक कार्यक्रमातच. कोल्हापुरातील त्यांच्या भेटी पण अशाच साहित्यिक उपक्रमातच होत आल्या आहेत. हे साहित्यिक गोतावळ्यात सर्वत्र दिसले तरी ते कुणाचेच नसायचे. त्यांचा स्वतंत्र बाणा हा त्यांचा उपजत स्वभाव. वसंतरावांनी कुणाची प्रशंसा, प्रशस्ती करणं हा कपिलाषष्ठीचा योग समजायचा; पण हे गौरवपत्र लाभणारं पात्र सापडणं महाकठीण गोष्ट. त्यामुळे वसंतरावांचं भाषण म्हणजे जाहीर खांडोळी हे ठरलेलंच. त्यामुळे भलेभले त्यांना दचकून असत. कोणी त्यांच्याशी पंगा घेतल्याचे मला आठवत नाही. भाषणातील वसंतरावांचे तर्क मात्र बिनतोड असत. मांडणीत पूर्वचिंतन असायचं. सतत तिरका विचार करणारे वसंतराव मनाने व व्यवहाराने सरळ. त्यांच्या बोलण्यात असहमतीचा थेटपणा असला तरी त्यास मी गरळ कधीच म्हणणार नाही; कारण त्यात व्यक्तिद्वेष नसायचा. तर्काच्या कसोटीवर, स्वविवेकाच्या लिटमस पेपरची टेस्ट त्यांच्या लेखी फायनल असायची.

 पेयपान, रसपानाचा त्यांना छंद असला तरी त्याला मी व्यसन म्हणणार नाही. तो त्यांच्या आस्वादक जीवनशैलीचा एक नाजूक अध्याय, जयशंकर प्रसाद यांची एक कथा आहे. बहुधा ‘मधुआ' असावी. त्यात एक शराबी चित्रित केलाय प्रसादांनी. तो दारू का पितो असं त्यातलं सरदारजी पात्र त्याला विचारतं, तो उत्तर देतो की, ‘इतिहासकाळातले राजे आपल्या शहजादींना (राजकुमारींना) आश्वासन देऊन युद्धावर जात; पण परतत नसतं. त्या अख्खं आयुष्य झुरत काढायच्या. त्यांचं झुरणं विसरावं म्हणून तो शराबी दारू

माझे सांगाती/५३