पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रोजीरोटीच्या प्राणिशास्त्रापेक्षा त्यांना प्राणप्रिय होता असे मी ऐकून आहे.
 प्राचार्य डॉ. मधुकर फरताडेंच्या मनात कॉलेज, संस्था, समाज, विद्यार्थी यांच्याबद्दल अनेक स्वप्नं होती. ती स्वप्न उराशी कवटाळून ते माणसांचा गोफ गुंफत होते. माणसांची माळ, त्यात मणी ओवत असतानाच ती तुटली. त्या स्वप्नभंगाचं शल्य समाजव्याप्त होतं. म्हणून त्यांना निरोप द्यायला अख्खी बार्शी लोटली होती. बार्शीत अशी गर्दी मामांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यानी जमवली. 'सा' रंगात येण्यापूर्वी भंगला. माळ पूर्ण होण्यापूर्वी तुटली याची चुटपुट जाणा-या फरताडे सरांना जितकी लागून राहिली नसेल, त्यांच्या कुटुंबीयांना जितका धक्का बसला नसेल, त्यापेक्षा समाजमनाला पडलेला पिळा मोठा आघात होता. ती भरून न निघणारी हानी होती. ती नाटकातील तरबेज नटाची रुखरुख लावणारी एक्झिट होती. या मित्रवर्याला पहिली श्रद्धांजली वाहताना ते कर्मकांडी श्राद्ध होणार नाही, याची काळजी नि खबरदारी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून घेणाच्या सर्वांची आहे. त्यांच्या जिद्दीने नि जोमाने कार्य करीत राहणं त्यांची अपूर्ण स्वप्नं पूर्ण करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

नसते गरज नवे दीप उजाळण्याची,

जळता दिवा जपणंही जोखीम असते
 मृताप्रत प्रतिबद्धता जपण्याची !






माझे सांगाती/५१