पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/51

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


संग्रहालयाची उभारणी करताना मला संस्था व प्राचार्य दोघांना घेऊन मार्ग काढायला लागत होता; पण उभय पक्षांची भूमिका सकारात्मक असायची. प्राचार्य फरताडे यांची गाडी कायमटॉप गिअरवर तर डॉ. यादवांची थर्ड गिअरवर. उलटं असायला हवं होतं; पण सुलट पट होता. संस्था कासरा ताणत असायची. प्राचार्य फरताडे यांना कासच्याला ढील हवी असायची. ते 'डिल' मी करीत राहायचो.
 प्राचार्य फरताडे सरांच्या कॉलेजचा विकासरथ त्यांना ऐंशीने पळवायचा होता. त्यांना गाडी चाळीसनेच चालवावी लागायची. त्यांची मोठी तगमग असायची. आतल्या आत ते चडफडत राहायचे; पण विकासावरची आपली ठोकलेली मांड त्यांनी कधी ढिली पडू दिली नाही. ते कुशल प्रशासक होते. टास्क मास्टर होते. योजलं की झालं पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. माझ्या स्वत:च्या अनुभवावरून सांगतो, आपले सहकारी कुरकुरत असतील, तर आपण आपलं कार्य करतो असं समजायचं. प्राचार्य फरताडे सरांचे सहकारी नाराज नव्हते; पण तक्रारीचा सूर असायचा. कामाची पण सवय, ध्यास असावा लागतो. प्राचार्य फरताडे सरांना आपलं 'ए' ग्रेड कॉलेज ‘इन्स्टिट्यूट ऑफ पोटेंशियल' व्हावंसं वाटायचं. ते सतत धडपडत असायचे. एकदा मी कोणत्या तरी क्षणी म्हटलं की हे विद्यापीठ व्हायला हवं. झालं, त्यांचं स्वप्न सुरू. असा हा स्वप्नामागे धावणारा शिक्षणप्रेमी होता. त्याला अपयश माहीत नव्हतं. खरं तर अपयशाशी वैर घेऊनच ते जन्मले होते. हे शक्य असतं त्याच माणसाला. ज्याच्या आत खोलवर काही करावं, घडावं अशी ऊर्जा असते नि ध्यासही! प्राचार्य मधुकर फरताडे असे ध्यासमग्न नि कार्यतत्पर प्राचार्य होते. रडणारे, रडगाणे गाणारे त्यांच्या आसपासही फिरकायचे नाहीत. भारदस्त छातीवर त्यांनी ल्यालेलं जाकीट त्यांना शोभायचं, ते त्यांच्या निधड्या कार्य-कर्तृत्वामुळे!

 करवंदीचे काटे, खडकाचा राकटपणा, आवाजातील खर्ज घेऊन आलेले प्राचार्य फरताडे यांना संगीत, गीत-गायन, भजन, शास्त्रोक्त रागदारी यांची जाण होती. त्यात त्यांना गती होती असं सांगितलं तर प्रथमदर्शनी कुणाचा विश्वास बसणार नाही; पण सुगम संगीत, भजन, रागदारीमध्ये सर्वांत ज्यांनी त्यांचा लागलेला ‘सा' ऐकला त्यांनाच त्यांच्या संगीताची हुकमत समजणार. मराठमोळ्या माणसाच्या गळ्यात न शोभणारा त्यांचा पंचम मी ऐकला आहे. हे संगीत त्यांनी कुठल्या क्लास, क्लबात मिळवलं नव्हतं. ते आलं होतं गावकुसाच्या द-याखो-यांत ऐकलेल्या धनगरी ओव्या, भारुडे, गावच्या देवळातील मनमुराद गाणाच्या भक्तांच्या अनवट मैफिली-फडांतून उमललेला तो एक सहज प्रतिध्वनी होता. त्यांच्या कॉलेजातील संगीत विभाग त्यांच्या

माझे सांगाती/५०