पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

...तर हे शतक माणसांचे राहील


 ‘माझे सांगाती' हा व्यक्तिलेख संग्रह होय. मी ज्यांच्या कार्यसहवासात वाढलो, घडलो अशांच्या काही स्मृती, पैलूंबद्दल इथं लिहिलं गेलं आहे. हे लेख वेगवेगळ्या प्रसंगानी, औचित्याने लिहिले गेले आहेत. शताब्दी, स्मरण, गौरव, निवृत्ती, अमृतमहोत्सव, सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा अशा प्रसंगानी केलेले हे लेखन होय. त्यामागे सहवास, संस्कार, साहाय्याप्रती कृतज्ञतेचा भाव आहे. काही लेखांत सामाजिक गौरवही आहे. यांत सान, थोर सारे आहेत; पण यांत वयापेक्षा सान्निध्य, सद्भाव मला मोलाचा वाटत आला आहे.
 माणसं, विशेषतः पूर्वसुरी मंडळी वर्तमान व्यक्तींच्या तुलनेने अधिक समर्पित, ध्येयवादी, निरपेक्ष कार्य करताना आढळतात. जी माणसं स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आली, जगली, झगडली अशांच्या जीवनात देश व समाजाप्रती विलक्षण ओढ असायची. स्वातंत्र्याचे रूपांतर स्वराज्यात करण्याचा त्यांच्यात ध्यास होता. स्वातंत्र्य चळवळीतील एकेकाळचे हे तरुण कार्यकर्ते. त्यांनी महात्मा गांधी, साने गुरुजींना पाहिले, ऐकले असल्याने, शिवाय त्यांचा त्यांना प्रत्यक्ष सहवास लाभल्याने ध्येयप्रभाव अधिक महत्त्वाचा. तद्वतच त्यांची मूल्यनिष्ठा व समर्पणही एकात्म, प्रतिबद्ध होते. 'साधी राहणी नि उच्च विचारसरणी हे अशा समाजसेवी व्यक्तींचे जीवन. या व्यक्ती मोठ्या पदांवर विराजमान झाल्या तरी या जबाबदारीचे आपण पाईक असल्याची जाणीव असल्याने त्यांच्या अधिकाराचा वापर त्यांनी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी केला. ही मंडळी तशी मितभाषी. 'हम नहीं, हमारा काम बोलेगा, ‘बातें कम, काम