पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्थेने स्मारक योजना करून ती माझ्यापुढे सादर करायची म्हणून मला चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. सन २०१३-१४ मध्ये केव्हातरी संस्थेनं एका कलाकाराकडून काही चित्रं काढून घेतली होती. त्यांची उठावचित्रे (म्युरल्स) तयार केली जायची होती. त्यांचं प्रदर्शन म्हणजे स्मारक अशी ती योजना होती. ती समजून घेऊन मी संस्थेस स्मारकाची कल्पना विशद केली. ती सर्वांना आवडली. खर्चिक असून, संस्थेची आर्थिक स्थिती नसतानाही संस्थेने वस्तुसंग्रहालयाचा संकल्प जाहीर केला. त्यात सकारात्मक भूमिका निभावण्यात डॉ. बी. वाय. यादव यांच्याबरोबर नंदन जगदाळे नि प्राचार्य डॉ. फरताडे आघाडीवर होते. सभा संपताच सर माझ्याजवळ आले नि म्हणाले, “तुमच्या कल्पनेतलंच स्मारक करायचं.' ती त्यांची नि माझी पहिली गळाभेट, इतर सर्व सर्वश्री प्राचार्य व. न. इंगळे, प्राचार्य चंद्रकांत मोरे, बाबा जगदाळे, प्रभृती होतेच; पण ज्याला सक्रिय पुढाकार म्हणता येईल, तो संस्थेइतकाच प्राचार्य फरताडे सरांचा होता.
 सभा संपताच प्राचार्य मधुकर फरताडे मला सर्वांसह आज ग्रंथालयाच्या ज्या इमारतीत वस्तुसंग्रहालय साकारले आहे, तिथे घेऊन गेले. संस्थेच्या नि सरांच्या योजनेनुसार एका छोट्या खोलीत स्मारक करायची कल्पना होती. त्यासाठी संस्थेने नि सरांनी ग्रंथालयाच्या पहिल्या मजल्यावर छोटी जागा मुक्रर केलेली होती. ती दाखविली. मला तर त्याच्या चौपट-पाचपट जागा अपेक्षित होती. ती होती, पण तिथे मूळ योजनेबरहुकूम यु.जी.सी. मान्यतेनं कॉम्प्युटर लॅब, ई-रीडिंग, टीचर्स स्टडी रूम असं काहीतरी नियोजन होतं. ते असताना प्राचार्य फरताडे सरांनी मागेल तितकी जागा देण्याची उदारता दाखविली. "Well beginning is half done' असं इंग्रजी सुभाषित आहे. त्याची प्रचिती देणारी ही उदारता मी कधीच विसरू शकणार नाही.

 आज त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. मी त्या उदारतेचा मागोवा घेतो आहे आणि एकेक गोष्टीचा मला उलगडा होतो आहे. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालयासाठी प्राचार्य डॉ. मधुकर फरताडे यांचा सततचा कोरा चेक का मिळत गेला? याचा शोध घेताना लक्षात आलं की, त्यांची घडण ही कर्मवीर मामांच्या संस्कार-सावलीत झाली आहे. मधुकर फरताडे बी. एस्सी. (प्राणिशास्त्र) पदवी घेऊन उत्तीर्ण झाले, ते श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शीमधूनच. सन १९७५ मध्ये बी.एस.सी. होऊन एम.एस्सी. करण्यासाठी म्हणून ते शिवाजी विद्यापीठात कोल्हापुरला गेले. सन १९७७ ला ते एम.एससी. झाले नि परत बार्शीला बी. एड्. करण्यासाठी म्हणून आले. सन १९७८ मध्ये ते बी. एड्. झाले हा काळ त्यांच्या जीवनातील अत्यंत संघर्षाचा

माझे सांगाती/४८