पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिद्ध संकल्पक : प्राचार्य मधुकर फरताडे

 प्राचार्य डॉ. मधुकर फरताडे यांचं नि माझं शेवटचं संभाषण त्यांच्या मृत्यूच्या आदल्याच दिवशी झाल्याचं चांगलं आठवतं. ती त्यांची नि माझी शेवटची मौखिक भेट. मी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालयाच्या उभारणीच्या कामासाठी म्हणून बार्शीला येत होतो. माझं सकाळी १० वाजता येणं अपेक्षित होतं. ड्रायव्हर उशिरा आल्यामुळे प्रवास उशिरा सुरू झाला. येणंही लांबलं. माझी वाट पाहत तिष्ठत राहिलेल्या फरताडे सरांचा फोन वाजला. त्या वेळी मी शेटफळ-कुडूवाडीजवळ होतो. ‘सर, तुमची तासभर वाट पाहिली. मला प्रवासाला निघायचं आहे. परवानगी द्या. पुढच्या वेळी भेटू. तुमची कामं लक्षात आहेत. झाली म्हणून समजा.' पुढची भेट त्यांच्या अनपेक्षित अपघाती निधनाने जिवंतपणी काही होऊ शकली नाही. मृत्यूनंतरही त्यांचं शव मिरज-पंढरपूर रस्त्यावर तासभर माझ्यासाठी तिष्ठत होतं. असं का व्हावं? माणसं जिवंतपणी असो वा मृत्यूनंतरही एकमेकांशी तिष्ठत वाट का पाहतात? त्यांचं एकच कारण असतं, परस्परांत निर्माण झालेले ऋणानुबंध! एकमेकांचे निर्माण झालेलं सुहृद नि अकृत्रिम मित्रत्व!!!
{{gap}]प्राचार्य फरताडे सरांचे नि माझे संबंध कामातून निर्माण झालेले. ती सभा मला चांगली आठवते. श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने मला सन २०१२ साली 'कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे सामाजिक कार्य पुरस्कार' दिल्यानंतर ती रक्कम व माझे काही पैसे घालून संस्थेस परत करीत मी इच्छा व्यक्त केली होती की, ‘इथं मामांच्या कार्याचं प्रेरक स्मारक व्हावं. त्याप्रमाणे



माझे सांगाती/४७