पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परंतु मोहनराव डकरे कधी समाजसंन्यास घेऊन टाळकुटं आयुष्य जगतील, असं मला वाटत नाही. आजघडीला त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला देऊ केलं आहे. आपण ज्या वटवृक्षाच्या सावलीत वाढलो, तो कल्पवृक्ष होऊन नव्या पिढीचा दीपस्तंभ व्हावा म्हणून ते कराडच्या ‘विरंगुळा'मध्ये अविश्रांतपणे यशवंतराव चव्हाण तथा त्यांच्या सुविद्य पत्नी वेणूताई चव्हाण यांचं जीवनसंचित जपत एखाद्या दक्ष नागाच्या जागरूकतेने नागमणी जपत डोलत, झुलत उत्तरायुष्य सत्कारणी लावीत आहेत. तीच त्यांच्या जीवनाची कृतार्थता बनली आहे.
 मोहनराव डकरे आज ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना लाभलेल्या सहस्त्रचंद्रदर्शन योगाचा आनंद माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना होणे स्वाभाविक आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभावेच; पण त्यापेक्षा ते यशवंतराव चव्हाण यांच्या ऋणातून उतराईचा जो यज्ञ करीत आहेत, ज्या समाजसमीधा ते वाहत आहेत, त्या अनवरत चालू राहण्यासाठी त्यांचं दीर्घायुष्य ही समाजाची गरज आहे.
 आज आपण सर्वजण ज्या एकविसाव्या शतकात जगत आहोत, ते जग भौतिकाकडून अभिभौतिकाकडे वाटचाल करीत आहे. भौतिक म्हणजे सर्वस्व वाटू लागले. त्या काळाची स्वत:ची अशी एक अभिभौतिक गरज आहे, ती म्हणजे माणसाचं जीवनमूल्य! वस्तूला किंमत असते. जीवनाचं मोल नि मूल्य असतं. ते परहिताय जगण्यातून श्रीवर्धित होत राहतं. सामूहिक जीवनविकासाचा ध्यास हा आपल्या पूर्वपिढ्यांनी जपला, जोपासला होता. यशवंतराव चव्हाण अशा पिढीचे शिलेदार होते, ज्यांना सामाजिक बांधीलकीत स्वारस्य होतं. त्यांचे ग्रंथ, पत्रव्यवहार, लेखन, आदी वारशातून काय मिळतं? असं विचाराल तर त्याचं उत्तर समाजशील जीवनसंस्कृती असंच द्यावं लागेल. मोहनराव डकरे तो ठेवा जपत असल्यानं त्यांचं जगणं महत्त्वाचं वाटतं. वि. स. खांडेकरांचं साहित्य वाचत यशवंतराव चव्हाण त्यांची पिढी समाजास जबाबदार घडली. त्या पिढीनं समाजऋण सर्वतोपरी मानत जीवन कंठलं. त्याला विचारमूल्य, आचरणाची जोड होती. आज त्याचा सर्वत्र दुष्काळ दिसतो आहे. अशा अवकाळी युगात विचार, वसा नि वारसा सुरक्षित राहण्यासाठी वर्तमान पिढीवर जतन साक्षरतेचा संस्कार आवश्यकच नाही, तर अनिवार्य झाला आहे. अशा काळात मोहनराव डकरे पूर्वपिढीचं संचित अमृतकुंभ मानून जपत आहेत.
 सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याप्रीत्यर्थ शुभचिंतन!



माझे सांगाती/४६