पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


राबवितात. बाबूराव शिरसाट हे राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवेचे रहिवासी. मी त्या भागात शिकलो असल्याने माझे अनेक मित्र त्या भागात आहेत. माझी भ्रमंतीही राधानगरी परिसरात असते. राधानगरी पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेचे ते संस्थापक आहेत. त्यामार्फत त्यांनी पंचायत समितीच्या कर्मचा-यांना आर्थिक साहाय्याचं छत्र उभारलं. आपल्या जन्मगावी त्यांनी ‘ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळ' स्थापन करून ग्रामीण भागातील शिक्षणवंचित बालक, बालिकांसाठी शाळा सुरू केल्या. राधानगरी तालुक्यात साहित्यजागर घडवून आणण्यासाठी त्यांनी ‘मायबोली साहित्य प्रतिष्ठान'ची स्थापना केली. तिच्यामार्फत साहित्य पुरस्कार, साहित्य संमेलन, साहित्य प्रकाशन समारंभ घडवून आणतात. या सर्वांतून त्यांच्यातील कुशल संघटक डोकावतो. ते अनेक सांस्कृतिक संस्थांचे मार्गदर्शक, सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांच्या कार्याचा डिंमडिम दूर कोकणापर्यंत पसरलेला आहे.
 मध्यंतरी मी एका ग्रंथालयाचा अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. त्या संस्थेच्या एका प्रकल्पासाठी आम्हाला आरोग्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र हवे होते. त्यांच्या कार्यालयातूनच ते आम्हाला मिळायचे होते. मी पाठपुराव्यासाठी एकदा जिल्हा परिषदेत गेलो असता बाबूरावांची गाठ पडली. त्यांनी काम समजावून घेतले. ते केले, इतकेच नव्हे तर घरपोहोच केले. या सर्वातूनही त्यांच्यातील कळवळा कार्यकर्ता मी अनुभवला आहे. आपल्या हाती असलेला अधिकार अथवा सत्ता जी माणसं सेवेचे साधन वा माध्यम मानून, बनवून वापरतात; ती खरी समाजशील माणसं! बाबूराव अशा पंक्तीतील गृहस्थ होत!
 बाबूराव शिरसाट यांना माणसं जोडण्याचा नि माणसांचा गोफ विणण्याचा छंद आहे. त्यांचं नि संवेदनशील माणसांचं सूत जमतं. आपला मानलेला माणूस, त्याच्या गुणांचा वापर समाजास व्हावा म्हणून ते पदरमोड करून लष्कराच्या भाकच्या थापत असतात. यातून त्यांनी माणसांचे मोहोळ जपलंजोपासलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कन्येचं लग्न होतं. त्याची गर्दी बाबूरावांच्या दर्दी माणूसछंदाची नांदी होती.

 बाबूराव शिरसाट हे समाजसंवेदी तसेच व्यक्तिलक्षी गृहस्थ! एकदा त्यांनी एखाद्यास आपलं मानलं की ते त्या माणसाभोवती अक्षरशः पिंगा घालत राहतात. हे त्यांचं प्रेम निरपेक्ष असतं. कधी-कधी त्यांना माणसं आपणास वापरतात नि विसरतात, याचं शल्य डाचत राहतं. बाबूरावांच्या लेखी ती अक्षम्य प्रतारणा असते. मग ते मूग गिळून गप्प राहतात. गरळ ओकायचा त्यांचा स्वभाव नाही; पण मग ते गोंडा घोळत राहात नाहीत. अबोल

माझे सांगाती/४१