पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या वेळी तालीम संघाने स्वयम् सेवादलाची स्थापना करून तरुण कार्यकत्र्यांची फौजच उभी केली होती. त्यात केशवराव जगदाळे यांचा पुढाकार होता. या संघात शहर व परिसरातील ६० तालमी सहभागी होत्या. या पायावर कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्ष सुरू झाला. सन १९४८ साली या पक्षाची कोल्हापुरात शाखा सुरू झाली. त्या वेळी पक्षाची स्वत:ची इमारत असलेला हा पहिला पक्ष ठरला. काँग्रेस भवनही त्या वेळी भाड्याच्या कार्यालयात होतं.
 स्वातंत्र्यानंतर आपण सन १९५0 ला प्रजासत्ताक भारताची स्थापना केली व सन १९५२ मध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे पहिले लोकप्रतिनिधी आपण निवडायचं ठरवलं. कोल्हापूर म्युनिसिपल कौन्सिल स्थापन होऊन सन १९५२ साली ज्या पहिल्या निवडणुका झाल्या, त्या केशवराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. पहिल्या तीनही निवडणुकांत शेतकरी कामगार पक्ष बहुमताने निवडून येत राहिला होता. दुस-या निवडणुकीत (१९५७५८) मध्ये तर शे. का. पक्षाने ४४ जागा जिंकून कोल्हापुरातील आपली हुकमत सिद्ध केली होती. याच काळात त्यांनी स्टैंडिंग, सुधारणा, अर्थ, इत्यादी समित्यांवर कार्य केले. सन १९६२ च्या निवडणुकीत ते सलग तिस-यांदा कौन्सिलर म्हणून निवडून आले व नगराध्यक्ष बनले.

 त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीतच शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठाला जमिनीची गरज होती. नगराध्यक्षपदाच्या जबाबदारीचे भान ठेवून केशवराव जगदाळे यांनी सागरमाळावरील आपली एक-दोन नव्हे तर तीस एकर जमीन दान देऊन एक अनुकरणीय आदर्श घालून दिला. एवढेच करून ते थांबले नाहीत, तर नगरपालिकेतर्फे त्यांनी पाच लाख पंचावन्न हजारांची ग्रँट मंजूर केली. तो चेक त्यांच्याच नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांच्याच हस्ते डॉ. अप्पासाहेब पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. २८ सप्टेंबर, १९६३ रोजी महागावकर बंगल्यात (सध्याचे ओपल हॉटेल, शिवाजी विद्यापीठ तिथे सुरू झाले) शिवाजी विद्यापीठाचा पहिला वर्धापनदिन साजरा झाला. तेव्हा केशवराव जगदाळे ‘प्रथम नागरिक' म्हणून सन्मानाने उपस्थित होते. केशवराव जगदाळे यांच्या पुढाकारातूनच सागरमाळावर विद्यापीठाच्या उभारणीस सुरुवात झाली, ती रस्ते तयार करण्याने. शाळा-शाळांतून मुले नगरपालिकेच्या ट्रकमधून माळावर श्रमदानासाठी नेली जात. त्यात मी श्रमदान केल्याचे आठवते. शिवाजी विद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभही महागावकर बंगल्यातच झाला होता.

माझे सांगाती/३६