पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/30

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


प्राचार्य राणे सर चांगले वाचक असल्याने त्यांच्या तो वाचनात आला. तो यायचंही एक कारण होतं. सर्व शिक्षक संघटना, प्राध्यापक संघटनांनी आपल्या मुखपत्रांतून त्याचं धडाधड पुनर्मुद्रण केलं होतं. शिवाय मुंबई विद्यापीठात या विषयावर एक मोठं चर्चासत्र योजलं गेलं होतं. प्राचार्य राणे सरांनी माझा फोन शोधून काढून माझं मन भरून कौतुक केलं. पुढे पत्रही पाठवलं. तेव्हा ते म्हणाले होते की, 'विद्यार्थी म्हणून तुझा मला अभिमान आहे. एकदा त्यांनी याच विषयावर शिक्षकांशी मला बोलायला लावलं. ही उदारता प्राचार्य राणे सरच दाखवू शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण अनाकलनीय होती. त्यांचे वडील ए. पी. राणे गारगोटीत काही काळ संचालक होते. पुढे ते शेतकरी सहकारी संघाचे संचालक सचिव झाल्याचं आठवतं. मी अप्पासाहेब जाधव यांच्याकडे जात असे. त्यांचा हिंदी व्यासंग होता. त्यातून राणे सरांच्या खानदानी घडणीची, एक प्रकारच्या सरंजामी बैठकीची कल्पना येत राहायची. त्या साच्या पार्श्वभूमीवर सरांचं करारीपण उठून दिसत असलं तरी लोकांना मानवायचं नाही हे खरं!
 सर प्राचार्य म्हणून निवृत्त झाले तरी अनेक संस्थात ते सक्रिय होते. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव वृत्तपत्र प्रशिक्षण केंद्र ते चालवत. के.आय.टी. कॉलेजचे ते चेअरमन होते. हिल रायडर्सची त्यांची भ्रमंती असायची. या दरम्यान मी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्य करू लागलो होतो. सर वृत्तपत्र विद्याथ्र्यांना दरवर्षी माझे एक मुक्त व्याख्यान मानव अधिकारावर योजत. ते आणि वसंतराव सप्रे मोठ्या आदराने मला बोलावत. सर माझी ओळख करून देत... पण विद्यार्थी म्हणून श्रेय घ्यायचे नाहीत. ही त्यांची ऋजुता खानदानी होती. मग मीच भाषणात सराबद्दल बोलत राहायचो.
 सरांचा मुलगा छोटू डॉक्टर झाला. त्या वेळी मी अनाथ मुलांच्या संगोपन क्षेत्रात कार्यरत होतो. अनाथ अर्भकांसाठी आम्ही 'वात्सल्य बालसदन' हे पाळणाघर सुरू केलेलं होतं. आम्हाला बालरोगतज्ज्ञांची गरज होती. छोटूला ते कुठून तरी कळालं. तो आमच्याकडे रूजू झाला आणि कोकणात जाईपर्यंत कितीतरी काळ त्यांनी मानसेवी डॉक्टर म्हणून आम्हाला साहाय्य केलं. हे असतात शिक्षक वडिलांचे संस्कार! प्राचार्य राणे सरांमध्ये उपजत सामाजिक भान होतं. आजोबा, वडील आणि नातू अशा सलग तीन पिढ्यांत समाजभान आढळणं अपवाद!

 प्राचार्य अमरसिंह राणे यांचे माझ्या जीवनावर पुरून उरणारे संस्कारण आहेत. त्यातून मी एकाच उपायाने उतराई होऊ शकतो. त्यांनी मला जे दिलं, ते मी पुढच्या पिढीस देत राहणं, दिव्याने दिवा पेटवत राहिलो तरच प्रकाशाचा

माझे सांगाती/२९