पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारण एकमेव. काडीपैलवान, पोटाला मिळायची मारामार. वजन कुठून भरणार? हॉस्टेलमधील माझ्या रूममधील अन्य तिघे सिलेक्ट. मी रिजेक्ट. ते माझ्या मनाला फार लागलं. मी रडतच सरांना भेटलो. रड्याच होतो. हळवापण तितकाच. सर मात्र कठोर. म्हणाले, रडणा-यांना आम्ही एन. सी. सी.त घेत नसतो. सेनेत रडणारे नाहीत चालत. लढणारे हवेत.' मी निराश होऊन परतायला लागलो तर थांबवून घेतलं. बेल वाजवली व शिपायाला एन. सी. सी. इन्स्ट्रक्टर गावडे यांना बोलावून घ्यायला सांगितलं. थोड्या वेळात ते आले. सरांनी त्यांना माझी सारी कहाणी कथन केली आणि म्हणाले, “याला एन. सी. सी. घेऊ या. बिस्किटं खायला घालू या. बघू या, तेवढ्यानं तरी त्याचं वजन वाढतं का?' या साच्यातून सरांचं विद्याथ्र्यांवरचं प्रेम आम्हा सर्वांच्याच लक्षात येत राहायचं.
 प्राचार्य राणे सर प्रेमळ असले तरी प्रशासनात कठोर होते. आमच्या हॉस्टेल्सवर अनेक गैरसोई असायच्या. शिक्षकांची वानवा असायची. विद्यार्थी अक्षरशः वैतागून जायचे. आम्ही दुस-या वर्षाला (एस. वाय.) गेलो तरी सुधारणेचं नाव नाही. काम संस्थेचं असलं तरी आमच्या लेखी ते संचालक, प्राचार्यांचं असायचं. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी कंटाळून बेमुदत संप पुकारला. मोर्चा काढला. मौनी विद्यापीठाच्या इतिहासातील तो पहिला व पूर्ण यशस्वी संप. आम्हा विद्याथ्र्यांची मागणीच होती... ‘राणे, डोणे हटाव!' (प्राचार्य, संचालक) सरांना ते लागलं. ते राजीनामा देऊन तडकाफडकी निघून गेले. आम्हा विद्याथ्र्यांना वस्तुस्थिती नंतर कळली; पण बाण सुटलेला होता. जो बूंद से गई, वह हौज से नहीं आती?' यातूनही प्राचार्य राणे सरांचा करारीपणा माझ्या मनावर कोरला गेला आहे, याचा मला मोठा अभिमान आहे की मी सरांचा विद्यार्थी आहे.

 श्री मौनी विद्यापीठ प्राचार्य राणे सरांनी सोडलं आणि ते विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. दरम्यान बरीच वर्ष उलटून गेली होती. मी शिक्षक झालो. शिक्षक संघटनेचा कार्यकर्ता झालो. नंतर एम. ए, पीएच.डी. होऊन प्राध्यापक झालो. मधल्या काळात गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठात रक्तरंजित संघर्ष झाला. माझा एक मित्र मुरलीधर देसाई... ह्याचा खून झाला. प्राचार्य डॉ. अंबादास माडगूळकरांना गारगोटी सोडावी लागली. आता शिक्षक कर्मचारीच रस्त्यावर उतरले होते. आमचे सर प्रा. श्रीपाद दाभोळकर लढ्याचं नेतृत्व करीत होते. लोकशाहीकरणाचा हा लढा यशस्वी झाला. त्याचा अभ्यास करून मी एक दीर्घ लेख लिहिला. 'शिक्षणसंस्थांचे लोकशाहीकरण तो ‘समाज प्रबोधन पत्रिका' या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रकाशित झाला.

माझे सांगाती/२८