पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भवरलाल जैन यांचे २५ फेब्रुवारी, २०१६ मुंबईच्या जसलोक रुग्णालयात उपचार घेत असतानाच निधन झालं. सुमारे ८0 वर्षांच्या जीवनकाळात त्यांनी सहा दशके अहोरात्र कार्य केले. ते कार्य केवळ उद्योग, व्यापार, शेती अशा क्षेत्रांत बंदिस्त करता येणार नाही. वस्तुसंग्रहालय निर्मितीत भारतात त्यांनी नवा अध्याय निर्माण केला. भारतातील आजवरची वस्तुसंग्रहालये स्थिर व वस्तुरूप होती. वस्तुसंग्रहालयास दृक्श्राव्य बनविण्याचे योगदान हे भवरलाल जैन यांचंच. थेंबाचे लक्ष कण करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे शेती व सिंचन क्षेत्रातील मूलभूत उपयोजित संशोधन होय. जलसंधारण व मृदसंधारण यांची सांगड घालत त्यांनी पाण्याच्या पुनर्वापरावर भर दिला. उद्योगास निरंतर संशोधनाची जोड देऊन उद्योगाचे प्रतिदर्शी रूप (Role Mode) त्यांनी जगापुढे ठेवले. इस्राइल व जपान दोन्ही देशांची सांगड घालणा-या या उद्योगी महात्म्याकडे गांधींच्या विश्वस्त वृत्तीचा आदर्श म्हणून पाहावे लागते. राजकारणात राहन समाजकारणी, उद्योजकांत राहून शेतकरी, समृद्धीनंतर वितरागी जीवनशैली अशा अनेक अंग नि पैलूंनी भवरलाल जैन यांचे जीवनकार्य, विचार समजून घेता येतात. मला या गोष्टीचा अभिमान वाटतो, की गर्भश्रीमंत होऊनही हा माणूस माणूसकीचा गहिवर घेऊन जगत राहिला. त्यांचे मन व्यापारात कठोर, कणखर असेल; पण जीवनाच्या क्षेत्रात ते नेहमीच संवेदनशील, समाजशील राहिले. माझ्या एका विद्यार्थ्यास त्यांनी शिक्षक म्हणून निवडले. त्याला फक्त एकच वाक्य सांगितले, बडे भाऊंनी, 'तुझ्या शिक्षकांप्रमाणे तू असावास म्हणून घेतो. एका वाक्याच्या प्रभावाने त्या विद्यार्थ्यांचा कायाकल्प झाला. मी भाऊंच्या कामगार, कर्मचा-यांमध्येही भाऊंबद्दलचा आदर, प्रेम पाहिले. ते मालक म्हणून कमी, पालक म्हणून अधिक दिसले. सर्वसामान्य माणसात तुमची प्रतिमा काय असते, ही तुमच्या आयुष्याची खरी इतिश्री. भवरलाल जैन घरी नि दुनियेतही ‘बडे भाऊ होते. गांधीवादी जीवनव्यवहार त्यांनी आत्मसात नाही केला. उपजत होताच. तो फक्त त्यांनी बांधीलकीपूर्वक वृद्धिंगत केला. दिव्यत्वाची त्यांच्यातून आलेली प्रचिती मला कर जोडण्यास, कृतज्ञ होण्यास भाग पाडते, हीच त्यांची जीवनथोरवी...

माझे सांगाती/१३२