पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गांधीवादी उद्योजक : भवरलाल जैन

 जैन इरिगेशन, गांधी तीर्थ, लेखन व्यासंग, मनुष्यसंग्रह, शेती, निसर्ग, साहित्यप्रेमी अशा अनेकविध कारणांनी मी भवरलाल जैन यांना ओळखून होतो; पण प्रत्यक्ष परिचय होण्याचा योग जळगावच्या ‘सीड' संस्थेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने आला. माझे मित्र डॉ. प्रसन्नकुमार (रेदासनी) ‘सीड'चा कार्यक्रम आटोपल्यानंतर मला भवरलाल जैन यांच्या भेटीस रात्री त्यांच्या घरी घेऊन गेले होते. भेटीत या गोष्टीचा मला सुखद धक्का बसला की, त्यांनी मी वि. स. खांडेकरांचे संपादित केलेले साहित्य वाचलेले होते. विशेषतः ‘दुसरे प्रॉमिथियस : महात्मा गांधी' शिवाय माझे आत्मचरित्र ‘खाली जमीन, वर आकाश' ही पहिल्या भेटीत आम्हा उभयतांत स्नेह जडायची अनेक कारणे समान होती ती म्हणजे खांडेकर, गांधी आणि साहित्यप्रेम! पहिल्या भेटीत भवरलाल जैन यांचा लाघवी स्वभाव माझ्या लक्षात आला. अकृत्रिम मैत्रभाव त्यांच्यात उपजत असल्याचे माझ्या लक्षात आला. कोल्हापूरला परतल्यावर मी माझे समग्र लेखन त्यांना भेट म्हणून पाठविले होते. ते वाचून आवडल्याचेही आवर्जून कळविले होते. एव्हाना त्यांचे वस्तुसंग्रहालय सहायक, तज्ज्ञ, लेखक भुजंग बोबडे यांचाही परिचय झालेला. ते आता माझ्या नि बडे भाऊ अर्थात भवरलालजींमधील मैत्री दृढ करणारे सेतू बनले होते.

 भवरलाल जैन यांनी उभारलेलं गांधी तीर्थ मी पाहिले नि भाऊंच्या प्रती माझ्या मनातील प्रेमाची जागा आदराने घेतली. महात्मा गांधी तीर्थ उभारून

माझे सांगाती/१२८