पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/128

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


कळस म्हणजे त्यांना आम्ही मासिक ७५ रुपये इतके अल्प मानधन देत असू. ते महिन्याच्या महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा करीत राहायचो; पण वीस वर्षांत ते त्यांनी कधी स्वत:साठी वापरले असे घडले नाही. दरवर्षीच्या मार्चमध्ये ते सर्व रकमेचा चेक संस्थेस देणगी म्हणून पाठवित. इतकी व्रतस्थता व निरीच्छता मी कुणाच्यात पाहिली नाही. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीची दखल घेऊन कोल्हापूर 'सकाळ'ने आपल्या वर्धापनदिनी त्यांचा केलेला गौरव हा माझ्या दृष्टीने 'कोल्हापूर भूषण'पेक्षा कमी महत्त्वाचा नव्हता.

 डॉ. करंडे म्हणजे 'देवमाणूस' असं प्रत्येक परिचिताला का वाटावं? यातच त्यांच्या जीवन, कार्य, विचार, मूल्ये, वृत्ती यांची थोरवी सामावलेली आहे. ते संवेदी धन्वंतरी ठरावे असं त्यांचं कार्य, कर्तृत्व! त्यात शोभा नसायची, असायचं सौंदर्य! काही बाबतींत मात्र ते फार कठोर होते. विशेषतः सेवा संस्थांमध्ये राजकारण करण्याच्या वृत्तीचा त्यांना तिटकारा असायचा. अशा लोकांपासून ते स्वत:ला दोन हात दूर ठेवीत. 'असंगाशी संग' त्यांना कधी जमला नाही, ते त्यांच्या उपजम सभ्य वृत्तीमुळे. ते फार श्रीमंत गृहस्थ नव्हते आणि नाहीत पण; परंतु मनाची श्रीमंती त्यांच्या दृष्टीने मोठी गोष्ट होती. गांधीवाद न उच्चारता त्यांनी आचरला. ख्रिश्चन धर्माचा सेवाभाव त्यांनी धर्मांतर न करता जपला. हे सारं घडतं माणसाच्या स्वीकृत मूल्यनिष्ठतेतून. जो माणूस स्वेच्छेने एखादे मूल्य, तत्त्व व आचार स्वीकारतो, ते जपण्यापाळण्याचे निकषही त्याचे स्वत:चे असतात. अशी माणसे कधी स्वत:स दुस-याच्या तुलनेच्या आरशात पाहत नसल्याने ते आत्ममग्न समाधानीच असतात. डॉ. करंडे कुटुंबवत्सल गृहस्थ. आपल्या मुलाइतकेच नातवात गुंतलेले मी पाहतो तेव्हा लक्षात येते की आप-परच्या पलीकडचा त्यांचा नित्य व्यवहार त्यात घरी एक नि दारी एक असा फरक नाही. आतबाहेर एक असणारी माणसं सुसंगत जीवन जगत समाजासाठी अनुकरणीय आदर्श बनतात. तसे डॉ. विजय करंडे होत. उतारवयातही त्यांच्या सेवापरायण व कर्तव्यतत्परतेत तसूभर न्यून आलेले नाही. व्रतस्थ माणूस घेतला वसा टाकत नसतो. निरंतरता झरते ती आत्मविस्मृत करणा-या परहितदक्ष कर्तव्यभावनेने. तेच डॉ. विजय करंडे यांचे बलस्थान व जीवनमर्मही!

माझे सांगाती/१२७