पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संवेदी धन्वंतरी : डॉ. विजय करंडे

 हा काळ सन १९७५-७६ चा असावा. दिवस आणीबाणीचे होते. घरं बदलत मी कोल्हापूरच्या राजारामपुरी उपनगरात येऊन स्थिरावलो होतो. घरी मी, पत्नी, आई व छोटा मुलगा निशांत होतो. निशांत अगदी लहान होता. वर्षभराचा असावा. लहान मुलांच्या डॉक्टरांच्या शोधात मला प्रथमतः डॉ. विजय करंडेंचं नाव कळलं. सांगणारी घरमालकीण व मोलकरीण दोघींनी वेगवेगळ्या वेळी पण एकच गोष्ट सांगितली, ती अशी की गरिबांचा डॉक्टर हाय! हातात गुण हाय आणि पैशाचंबी काय नसतं... पैसे नसलं तरीबी औषधं देतो. फकत वेळ वंगाळ लागतुया... हीऽऽऽ गर्दी असतीया बगा!' मी नि रेखा बाळाला घेऊन गेलो तेव्हा वरील सर्व वर्णन तंतोतंत खरे ठरल्याची अनुभूती आली. अनुभव हीच खात्री म्हणतात ते हेच.

 पुढे मी सन १९८१ च्या मध्यास केव्हातरी राजारामपुरीचं घर बदलले अन् मी सन्मित्र वसाहतीमध्ये राहण्यास आलो. एव्हाना मी शिक्षकाचा प्राध्यापक नि प्राध्यापकाचा डॉक्टर झालेलो. म्हणजे डॉक्टरेट संपादली होती. सौ. रेखा दुस-यांदा गरोदर होती. नवं बाळ येणं हेही घरबदलाचं एक कारण होतं. जुन्या घरी डॉ. करंडेंचा दवाखाना चौथ्या गल्लीत तर मी पाचव्या. इथेही पहिल्या चौकात मी तर डॉ. करंडेंचं घर पुढच्या चौकाच्या तोंडावर. राजारामपुरीतील

माझे सांगाती/१२३