पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालयाच्या निमित्ताने डॉ. बी. वाय. यादव यांचे कार्य, जीवन, विचार, व्यक्तिमत्त्व जवळून पाहता, अभ्यासता आले. आतून-बाहेरून सज्जन, पापभिरू माणसं मिळणं दुर्मीळ होत चाललेल्या आजच्या काळात असा एक समाजपुरुष समकालात आपल्या आजूबाजूस आहे, हा दिलासा, आश्वासनही कडेलोट होणा-या समाजमनास दिलासा देत राहते. पणती जपून ठेवा’ ‘अंधार फार झाला, न म्हणता जी माणसं आपल्या सदाचरण नि सदाशयतेचा सडा सर्वदूर शिंपडत राहतात, त्यामुळे नैतिक अध:पतनाचे निसटते चिरे, बुरूज ढासळणे थांबते. चांगले वागू इच्छिणाच्यातला विझू पाहणारा नंदादीप सुरक्षित राखण्याचे कार्य अशा साधुपुरुषांकडून परोक्षपणे होत राहते. हीच या माणसांची खरी दौलत व वर्तमानास लाभलेले वरदान, योगदान होय. येणारी आदर्श होऊ पाहणारी जी पिढी आहे, त्यांना डॉ. यादव यांचे जीवन दीपस्तंभ बनून दिशा दाखविते. मार्गदर्शन करते. एक नवी आशा, पालवी, किरण निर्माण होण्याच्या लक्ष-लक्ष शक्यता निर्माण होतात त्या अशा विभूतींमुळे ज्यांच्यापुढे नतमस्तक होऊन हात जोडून ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती' म्हटले तरी स्वत:ला धन्य वाटावे.


माझे सांगाती/१२२