पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/122

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


सिद्ध होते. एस. एस. झाले खरे; पण डॉ. बी. वाय. यादव यांच्यापुढे सन १९७४ साली विविध पर्याय होते. त्या काळात एम. एस. झालेले डॉक्टर अपवाद होते. त्यांना विदेशात जाणे शक्य होते. असे असताना कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची धडपड व गुरू डॉ. फ्लेचर यांचा वारसा व आदर्श जपायचा म्हणून डॉ. बी. वाय. यादव यांनी सर्व आमिषे, प्रलोभने, स्वार्थ लाथाडून अनवाणी डॉक्टर व्हायचे ठरविले. ४ फेब्रुवारी, १९७५ रोजी त्यांनी कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची इच्छा प्रमाण मानून एम. एस. असतानाही अवघ्या सहा खाटांचे छोटे रुग्णालय ‘आरोग्य मंदिर' या नावाने सुरू केले. आज बार्शी व उस्मानाबाद परिसरातील जनतेची जीवनवाहिनी बनलेले ‘कर्मवीर मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल सुमारे ३५० खाटांचे रुग्णालय बनून अहर्निश गोरगरीब रुग्णांवर उपचार करीत मानवतावादी सेवाकार्य करीत आहे. लवकरच ‘ट्रॉमा सेंटर' सुरू होत असून हे केंद्र स्वप्नापलीकडचे सत्य बनत आहे. त्यामागे डॉ. बी. वाय. यादव यांची गेल्या ४० वर्षांची अविरत सेवा कारणीभूत आहे. तळागाळातील शेतमजूर, दलित, गोरगरीब जनतेस हे रुग्णालय जीवनदान ठरले आहे. डॉ. बी. वाय. यादव हे सर्व निरपेक्षतेनं करतात त्यामागे एक वैयक्तिक शल्यही कारण बनून आहे. त्यांचे जन्मदाते वडील लहानपणीच वारले. आपल्या वडिलांना ते प्रतिकूल परिस्थितीमुळे वाचवू शकले नाहीत. आईने त्यांचा कष्टाने सांभाळ केला. मामांनी आधार दिल्यामुळे त्यांचे शिक्षण होऊ शकले. त्याची उतराई म्हणून डॉ. बी. वाय. यादव यांनी आजीवन संस्थेसाठी वाहन घ्यायचे ठरवून गेली ४०-४२ वर्षे निरंतर पूर्णवेळ सेवक बनून समर्पित समाजसेवक ते म्हणून कार्यरत आहेत.
 मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर डॉक्टरांनी मामासाहेब जगदाळे यांची मृत्यूपर्यंत १७ वर्षे शुश्रूषा केली. आपल्या आईचा तिच्या ९२ व्या वर्षांपर्यंत सांभाळ करून ऋणमुक्ती यज्ञ चालविला. या कृतज्ञतापूर्ण सेवेस शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य!
 आज डॉ. बी. वाय. यादव केवळ मामांच्या संस्थेचे राहिले नाहीत. बार्शी पंचक्रोशीतील सर्व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी विश्वस्त म्हणून ते ‘सार्वजनिक चरित्र' बनले आहेत. हरिजन सेवक संघ, कॅन्सर हॉस्पिटल, रेडक्रॉस सोसायटी, रामभाऊ शहा रक्तपेढी, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल, भगवंत मंदिर, श्रीराम मंदिर (परांडा), पोफळे ट्रस्ट, रोटरी क्लब अशा सर्वांचे ते

आधारवड बनले आहेत. आजवर त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘बार्शीभूषण' सह अनेक मान्यवर, प्रतिष्ठित पुरस्कार लाभले आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘दलितमित्र पुरस्कार' देऊन सन्मानित केले आहे.

माझे सांगाती/१२१