पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षकांनी बबनला बार्शीला मामांच्या बोर्डिंगमध्ये पाठवायचे ठरविले. तो काळ अशिक्षित पालकांचा असल्याने शिक्षकच मुलांचे भवितव्य व पुढील शिक्षणाचे मार्गदर्शन व तजवीज करीत. सन १९५९-६० च्या शैक्षणिक वर्षात बबन मामांच्या बोर्डिंगमध्ये दाखल झाला. तो प्रवेश त्याच्या जीवनाचा कायाकल्प करणारा ठरला. कारण इथे शिकेल तेवढं नि पाहिजे त्या सर्व शिक्षणाची सोय होती. बोर्डिंगचा नियमित परिपाठ, मामांचे संस्कार, परिसरातील शैक्षणिक वातावरण, गुणवत्तेची स्पर्धा, ध्येयवादी शिक्षक या सर्वांचा परिणाम म्हणून बबन यादव नावाचा किशोरवयीन मुलगा चांगल्या मार्कोनी एस. एस. सी. होऊन नंतर दोन वर्षांनी इंटर सायन्सही मेरिटमध्ये उत्तीर्ण झाला. त्यामुळे परिस्थिती व परिसराचे वास्तव भान होऊन या ध्येयवादी तरुणाने डॉक्टर व्हायचं ठरवून मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सन १९६५ च्या दरम्यान सोलापूर, कोल्हापूर परिसरातील एकमेव वैद्यकीय महाविद्यालय होते. ग्रामीण भागातील डॉक्टर होऊ इच्छिणाच्या गरीब मुलांचे ते आकर्षण केंद्र होते. विद्यार्थी एकमेकांना मदत करीत. आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत नसले तरी सवलतीत शिक्षण मिळे. इथे त्यांना वसंतराव गरड यांच्यासारखा जीवाला जीव देणारा मित्र मिळाला. ग्रामीण भागातील गरीब, गरजू, अज्ञानी जनतेची सेवाभावे शुश्रूषा करण्याचा वसा घेतलेले, ज्ञान व अनुभवसंपन्न, ध्येयवादी डॉ. फ्लेचर, डॉ. कौंडिण्य, डॉ. डोनल्हसन यांच्यासारखे शिक्षक भेटल्याने डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहत असतानाच्या काळातच योगायोगाने मामांना मिरजेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इथे बबनराव यादव एम. बी. बी. एस. पूर्ण करीत होते; पण पुढे त्यांना एम. एस. करायचं होतं. मामांनी त्यांना बार्शीत येऊन गरिबांसाठी दवाखाना सुरू करूया म्हणून निमंत्रण दिलं. शिक्षण पूर्ण होऊ दे, मग मी भेटतो म्हणून डॉ. बी. वाय. यादव यांनी मामांना बार्शीत पोहोचवले व आश्वस्त केले. या सेवेतही त्यांना जीवन कळून पुढील आयुष्य कसे कंठावे याचा विचार सुरू झला. त्यांनी एकमात्र निश्चित केले की, आपण सेवाधर्म म्हणून डॉक्टरकी करायची.

 एम. बी. बी. एस.नंतर डॉ. बी. वाय. यादव यांनी एम. एस. परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केली. ते शिवाजी विद्यापीठाची एम. एस. परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण करणारे पहिले विद्यार्थी ठरले. या अभ्यासक्रमात त्यांना अमेरिकन डॉक्टरांच्या हाताखाली शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण लाभल्याने ते कुशल शल्यचिकित्सक बनले. प्रथम प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होता आली याचे श्रेय डॉ. यादव आपल्या अनुभवसंपन्न शिक्षकांना देतात. यातून त्यांची नम्रता व कृतज्ञताच

माझे सांगाती/१२०