पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांच्यामार्फत देण्यात येणा-या 'कर्मवीर मामासाहेब जगदाळे सामाजिक पुरस्कारासाठी माझी निवड केली. त्या समारंभात मला संस्थेने दिलेली रु. २५,000 ची रक्कम त्यात पदरचे ५,000 रुपये घालून ती मामांचे स्मारक केले जावे, अशी इच्छा व्यक्त करून मी परत केल्याचे आश्चर्य सर्व बार्शीकरांना होते; पण डॉ. यादव यांचे मामांशी असलेले विशेष ममत्व लक्षात घेता, त्यांना त्याचे अप्रूप वाटणे स्वाभाविक होते. एक तर आजवर अशी रक्कम कुणी परत केली नव्हती. शिवाय भाषणात मी मामांच्या स्मारकाची जी कल्पना विशद केली होती ती सर्वांना नवी होती. समारंभानंतर वर्ष दीड वर्ष उलटलं असावं. संस्थेचा निरोप आला म्हणून मी बार्शीस गेलो. दरम्यान त्यांनी स्मारकाची त्यांच्या कल्पनेप्रमाणे योजना केली होती. सादरीकरण करून समजावण्यासाठी म्हणून मला बोलावलं होतं. मी दरम्यानच्या काळात एक-दोन वस्तुसंग्रहालये उभारली असल्याने स्मारकाची माझी कल्पना व संस्थेची कल्पना यांत मोठे अंतर होते. माझ्या कल्पनेने सर्व भारावले. त्यांनी केलेली उठावचित्रे त्या कल्पनेपुढे नगण्य होती. योगायोगाने त्या वेळी संस्थेच्या श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाची इमारत पूर्ण होत आलेली. आमच्या चर्चेनंतर ती इमारत त्यांनी मला दाखविली. त्यातील एक प्रशस्त हॉल मिळाला तर मोठे वस्तुसंग्रहालय करणे शक्य आहे, असे सांगितल्यावर प्राचार्य मधुकर फडतरे यांनी उत्स्फूर्तपणे तो द्यायचे मान्य केले.

 वस्तुसंग्रहालयाचा संकल्प आणि सिद्धीमधील प्रवास खडतर होता; कारण त्यांच्याकडे साधने अशी हाती नव्हती. होती पण त्यांना त्याची जाणीव नव्हती. काखेत कळसा, गावाला वळसा' अशी स्थिती असल्याने शोधात लक्षात आले. माझे बार्शीला या संशोधन, साधन संकलनार्थ जाणे-येणे नित्याचे झाले व त्यातून डॉ. बी. वाय. यादव मला जे नि अशा प्रकारे समजत गेले ते कल्पनेच्या पलीकडचे सज्जन गृहस्थ निघाले. त्यातला एक प्रसंग मला आठवतो की कर्मवीर मामासाहेब जगदाळे स्मारकासाठी मी घेत असलेले कष्ट नि व्यक्त करीत असलेली आस्था, आदर पाहून चक्क एक दिवस ते उत्स्फूर्त माझ्या पाया पडते झाले. त्या क्षणाच्या शरम नि संकोचाने माझे जीवन अहंकारमुक्त झाले. या प्रसंगी जाहीरपणे मान्य केलेच पाहिजे, माणसं बदलतात यावर मामांचा असलेला विश्वास डॉ. बी. वाय. यादव यांनी स्वत:त उतरवला होता. आपणासारखे करुनी सोडावे सकळ जन हा एव्हाना त्यांचा सहजधर्म झालेला. हा माणूस आतून-बाहेरून वारकरी वृत्तीचा का? याचा जेव्हा मी शोध घेऊ लागलो, तेव्हा मला या वटवृक्षाची मुळे दूरवर त्यांच्या वाडी, वस्तीत, आईवडीलांत, पूर्वसंस्कारांत पसरलेली लक्षात येत राहिली. माणसाच्या

माझे सांगाती/११८