पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/118

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


बार्शीभूषण : डॉ. बी. वाय. यादव

माझे सांगाती (Maze sangati).pdf

 बार्शी, उस्मानाबाद परिसरातील सार्वजनिक डॉक्टर बार्शीच्या कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अनेक वर्षे अध्यक्ष असलेले डॉ. बी. वाय. यादव यांना मी प्रथम पाहिले सन २००६ मध्ये, असे खोदून खोदून आठवल्यावर लक्षात येते. प्रसंग होता ब्रह्मदेव माने प्रतिष्ठानच्या राजर्षी शाहू सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचा. त्या वर्षीचा तो पुरस्कार सोलापूरच्या या प्रतिष्ठानाने मला जाहीर केला होता. पुरस्कार वितरण सोहळा सोलापूरच्या हुतात्मा चौकातील भव्य सभागृहात होता. तो पुरस्कार त्या वर्षी मला देण्याचं प्रमुख कारण माझं खाली जमीन, वर आकाश' हे आत्मचरित्र प्रकाशित होणं असावं. समारंभाला बार्शीहून माझे मित्र प्राचार्य चंद्रकांत मोरे, प्रा. राजेंद्र दास, प्राचार्य व. ना. इंगळे आणि बरीच मंडळी टॅक्स करून बार्शीहून आवर्जून आली होती. त्यात डॉ. बी. वाय. यादव होते. सर्वांनी त्यांचा आदबीने परिचय करून दिला. त्यांच्या पोशाख, बोलणे, देहबोलीत कुठेही चेअरमन'पणाचा लवलेशही नव्हता. अत्यंत साधे, मितभाषी, नम्र गृहस्थ अशीच त्यांची प्रथमदर्शनी रुजलेली प्रतिमा गेल्या दहा वर्षांत विकसित झालेल्या निकटवर्ती मित्रनात्यात अधिक खोल व दृढ होत गेली.

 दरम्यान वेगवेगळ्या कारणांनी माझं बार्शीत जाणं, येणं घडत राहिलं होतं. चर्चासत्र, प्राध्यापक निवड अशी ती औपचारिक कारणं असल्यानं डॉक्टरांशी ओळखही औपचारिकच राहिली. पुढे सन २०१२ ला त्यांच्या श्री शिवाजी

माझे सांगाती/११७