पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. शासकीय सेवेत बदली अटळ असते. इकडे वडिलांचं वृद्धत्व, दृष्टीची पराधीनता, त्यांनी पैत्रुक जबाबदारी महत्त्वाची मानली. सुरक्षित शासकीय सेवा सोडून त्या असुरक्षित खासगी सेवेत आल्या. न्यू कॉलेजमध्ये काही काळ शिक्षणशास्त्र शिकवून त्या ‘आंतरभारती'त मराठी शिकवू लागल्या. मग आमच्या महावीर महाविद्यालयात त्या ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी शिकवू लागल्या. मंदाताईंची योग्यता सीनिअर प्राध्यापकाची ; पण केवळ कौटुंबिक जबाबदारी... भाऊंचा सांभाळ महत्त्वाचा मानून त्यांनी आपल्या वैयक्तिक आशा-आकांक्षांवर पाणी सोडलं. करिअर करता यावं म्हणून आपल्या वृद्ध वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणाच्या मुली आज जेव्हा मी पाहतो, तेव्हा मंदाताईंचं ‘श्रावणबाळ' होणं मला अस्वस्थ करीत राहतं. हा असतो संस्कारांचा न विझणारा नंदादीप!
 मंदाताई गेले तपभर तरी शयनमुद्रेत होत्या. त्या काळातही त्यांचा करारीपणा, शिस्त, संयम सारं चकित करणारं; पण अनुकरणीय! त्यांचा माझ्यावर किती विश्वास होता म्हणून सांगू! भाऊंचं सारं उर्वरित पाथेय त्यांनी माझ्या हवाली केलं होतं. त्याचं मी सोनं करू शकलो हीच त्यांना माझी सक्रिय श्रद्धांजली! मंदाताईंना ७७ वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं, त्यात त्यांनी त्यांच्या वडिलांच्या केलेल्या ऋणमुक्तीचा जितका वाटा आहे, तितकाच खांडेकर कुटुंबीयांनी दिलेला आधार आणि त्याची जीवश्चकंठश्च मैत्रीण असलेल्या श्रीमती आशा ताम्हणकर-भागवत यांच्या समर्पित सेवेचा वाटा तर लाख मोलाचा. मैत्र खरं तर तारुण्याची संगत असते म्हणे! आशाताईंनी हे खोटं ठरवत आयुष्यभर मंदाताईंची शुश्रूषा, संगत निभावत जो आत्मीय भाव निभावला, त्याला तोड नाही. रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेले धागे जास्त बळकट ठरतात असा माझा बनलेला दृढविश्वास. त्यात आशाताई, सुलभाताईंचं योगदान अविस्मरणीय!

 मंदाताई आज आपल्यात नसणं म्हणजे पितृसेवेचा नंदादीप विझणं! तो प्रज्वलित ठेवायचा तर प्रत्येकानं घरोघरी मातृ-पितृसेवेचा नंदादीप उजळत राहील अशी काळजी घ्यायला हवी. द्रौपदीची ही सेवाथाळी म्हणजे गरजवंताला दिलेला हात! मंदाकिनी आकाशात विझत असताना एक समाज मंगल, अविनाश, सुलभ, कल्पलता जिवंत ठेवणं यातच आपल्या सा-यांचे चिरंतन कल्याण, हित सामावलेलं. ते जपू, जोपासू तर श्रद्धांजली सक्रिय, सहवेदनेचा व्रतोत्सव बनेल.

माझे सांगाती/१०६