पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/106

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


दैनिक वापरातील सर्व वस्तू उदार हस्ते प्रदान करून त्या संग्रहालयास पूर्णत्व आणून दिलं होतं.
 भाऊंचा मंदाताईंवर जन्मापासून जीव होता. मंदाताईंचा जन्म दिनांक ६ ऑगस्ट, १९३७ चा. या जन्मापूर्वीच महिना दोन महिने भाऊंना त्यांच्या ‘छाया' चित्रपटाच्या पटकथेसाठी ‘कलकत्ता फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन'चं ‘गोहर गोल्ड मेडल' मिळालेलं होतं. आपल्या पहिल्या कन्यारत्नाला बाळलेणं (सोन्याच्या मुद्दया) घालता यावं म्हणून भाऊंनी पत्नी उषाताईंकडे ते मेडल दिलं. ते मोडून बाळलेणं केलं होतं. ते भारतीय चित्रपटसृष्टीचं पहिलं पदक होतं. नंतर 'फिल्मफेअर', इत्यादी पुरस्कार सुरू झाले. मंदाताईंचं शिक्षण म. ल. ग. हायस्कूल, राजाराम महाविद्यालयातून झालं. मंदाताईंच्या घडणीवर भाऊंचा मोठा प्रभाव होता. भाऊ गरीब विद्याथ्र्यांना हटकून मदत करीत. मंदाताईपण, मला आठवतं, मध्यंतरी १९९९-२000 च्या सुमारास मंदाताई। आजारी होत्या. त्यांना पूर्णवेळ काळजीवाहिकेची गरज होती. आमच्या बालकल्याण संकुलातील द्रौपदी त्या वेळी कमवत शिकू इच्छित होती. द्रौपदीला आम्ही मंदाताईंना जोडून दिलं. द्रौपदी चारएक वर्षे मंदाताईंकडे जायची. द्रौपदी मला सांगत राहायची, ‘मंदाताई स्ट्रिक्ट आहेत, पण तितक्याच प्रेमळ, काम झालं की तिनं अभ्यास करावा म्हणून त्या आग्रही असायच्या. द्रौपदी पुढे गरोदर राहिली. मंदाताईंचं काम सुटलं; पण येणंजाणं राहिलं. मंदाताई द्रौपदीला पुस्तकं, फीची मदत करत राहिल्या. द्रौपदी काळजीवाहिकेची अधीक्षिका झाली. कधी काळी नॉनमॅट्रिक असलेली द्रौपदी आज एम. ए. एम. एस. डब्ल्यू. आहे. तिचा आधार व प्रेरणा होत्या मंदाताई. अशी अनेक उदाहरणं मंदाताईंची उदारता अधोरेखित करतात. लोकांनी मंदाताईंचा कठोरपणा पाहिला. त्यांची उदारता ज्यांना अनुभवता आली, ते त्यांचे आत्मीय श्रोते झाले.

 वि. स. खांडेकरांचे चित्रपटसृष्टीतील लेखनिक कवी ग. दि. माडगूळकर होते; तर साहित्यिक लेखनिक म्हणून रा. अ. कुंभोजकर, डॉ. एस. एस. भोसले, बालसाहित्यकार रा. वा. शेवडे गुरुजी होते खरे; पण त्यानंतरच्या काळात मंदाताई भाऊंच्या लेखनिक बनल्या. त्या काळात मला लेखनिक कुणीही मिळेल; पण तू वेळेवर लग्न कर' म्हणून लकडा लावणा-या भाऊंना न जुमानता त्यांच्यातील लेखक मंदाताईंनी महत्प्रयासाने जिवंत ठेवला. मंदाताईंमधला शिक्षक भाऊंनी घडविला. मंदाताईंनी त्याची उतराई अनेक शिक्षक, प्राध्यापक घडवून केली. मंदाताईंचं सारं आयुष्य आपल्या वडिलांप्रमाणे शिक्षणव्रतात गेलं. प्रारंभी त्या शासकीय सेवेत शिक्षणशास्त्र विषयाच्या

माझे सांगाती/१०५