पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुतूहल माझ्या पिढीस असायचं. देशात आणीबाणी असतानाच्या काळात आमच्या 'आंतरभारती'मध्येही आणीबाणीसदृश परिस्थिती होती. आम्हा शिक्षकांचं आंदोलन सुरू होतं. वि. स. खांडेकर संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्याशी संपर्काचा दुवा होत्या मंदाताई. मंदाताईंना गैर खपायचं नाही. त्या शिस्तीच्या मोठ्या भोक्त्या. पत्नीचं निधन झाल्यावर भाऊंनी (वि. स. खांडेकरांनी) सन १९५८ नंतर पाच मुला-मुलींचं घर ज्या धैर्यानं सांभाळलं, मंदाताईंनी आपला भाऊ अविनाश लग्न होऊन स्वतंत्र राहू लागल्यावर तितक्याच समर्थपणे भाऊंना आणि अन्य भावंडांना आधार दिला. केवळ भाऊंना सांभाळायचं म्हणून त्यांनी अनेकांचे रोष पत्करले. भाऊंना दीर्घायुष्य लाभलं ते मंदाताईंच्या डोळ्यांत तेल घालून घेतलेल्या काळजी व सांभाळामुळे. मंदाताईंनी लग्नही उशिरा केलं होतं, ते भाऊंच्या काळजीतूनच.

 मंदाताईंनी वि. स. खांडेकरांच्या साहित्यास प्रकाशकीय न्याय मिळावा म्हणून पूर्वप्रकाशकांशी केलेली न्यायालयीन लढाई मराठी साहित्यिकांना आणि त्यांच्या वारसांना आर्थिक वरदान देणारी ठरली. ही लढाई न्याय क्षेत्रात मैलाचा दगड ठरली. अलीकडे भारत सरकारने इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अॅक्ट' दुरुस्त केला. त्याचा ही लढाई आधार ठरली होती, हे फार कमी लोकांना माहीत असावं. या लढाईच्या काळात भाऊंच्या साहित्याला न्याय मिळावा म्हणून मंदाताईंनी ‘विष्णू प्रकाशन' सुरू करून ‘सूर्यास्त', 'मध्यरात्र', ‘घरटे’, ‘अस्थी', “यज्ञकुंड' सारखे कथासंग्रह प्रकाशित केले होते. पुण्याच्या ‘अनमोल प्रकाशन'मार्फत मृगजळातले कमल व इतर कथा' सारखी दुर्मीळ पुस्तकं प्रकाशित केली होती. त्यातील ‘सौ. मं. व. निवसरकर', 'मंदाकिनी खांडेकर अशा पल्लेदार स्वाक्षरीसह मला भेट दिलेली कितीतरी पुस्तके माझ्या संग्रही। आहेत. आता मंदाकिनी (आकाशगंगा) मंद झाल्यावर मात्र तो स्नेह मला अधिक प्रज्वलित झाल्यासारखा वाटतो आहे. मंदाताईंनी ‘अमृतवेल' कादंबरीवर दरदर्शन मालिका बनविली होती. भास्कर जाधव यांनी मोठ्या आत्मीयतेनं त्या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं. महावीर महाविद्यालयाच्या स्टाफरूममध्ये मंदाताई, प्रा. घोडके, मी-आम्ही दीर्घकाळ संहितेबद्दल बोलत राहायचो असं आठवतं. शिवाजी विद्यापीठात आज भारतातील लेखकांचं पहिलं शास्त्रीय वस्तुसंग्रहालय उभारलं आहे. त्याची सुरुवातही मंदाताईंच्या पत्राने झाली होती. मंदाताई नुसतं पत्र लिहून थांबल्या नाहीत तर त्यांनी 'अश्रू' कादंबरीची हस्तलिखित प्रत आणि पद्मभूषण पदवी प्रशस्तीपत्र प्रदान करून वस्तुसंग्रहालयाच्या साधन संग्रहाचा प्रारंभ केला होता. नंतर तर त्यांनी खांडेकरांचे सर्व पुरस्कार, मानपत्रे,

माझे सांगाती/१०४