पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२९
राजकारण
 


स्वातंत्र्य
 दुसऱ्या युद्धाच्या काळात ते प्रथम जर्मनीला गेले. तेथे हिंदी सेना संघटित करावी, असा त्यांचा विचार होता. हिटलरचा त्यांना पाठिंबा होता. पण तेथे जमले नाही, म्हणून ते सिंगापूरला गेले. हा भाग जपानने आक्रमिलाच होता. तेथे जपानच्या साह्याने त्यांनी हिंदी लष्कर उभारले व ते घेऊन त्यांनी भारतावर स्वारी करण्याचा प्रयत्न केला. पण तो जमला नाही आणि एवढ्यात त्यांना मृत्यूने गाठले. पण सुभाषचंद्रांचे हे प्रयत्न फुकट गेले नाहीत. त्यांच्या त्या उठावणीने हिंदी लष्कराचा राष्ट्राभिमान जागृत झाला व त्याने मुंबई, कलकत्ता, कराची येथे उठावणी केली. बिटिशांनी हे काय आहे ते ओळखले. हिंदी लष्कराच्या बळावरच आपण हिंदुस्थानचे साम्राज्य करीत आहो, इंग्लंडमधून सैन्य आणून सत्ता चालविणे अशक्य आहे, हे ते पक्के जाणून होते. त्यांच्या प्रारंभीच्या इच्छेप्रमाणे स्वतःचा कारभार करण्यास हिंदी लोक समर्थ झाले होते. तेव्हा मेजर ॲटली यांनी तसे स्पष्टपणे जाहीर रीत्या सांगून हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याचा ठराव केला आणि अशा रीतीने दादाभाईच्या पासून सुभाषचंद्रांपर्यंत जे प्रयत्न झाले त्याची सांगता झाली.

भेदजर्जर
 हिंदुस्थानला हे जे स्वातंत्र्य मिळाले ते खंडित स्वातंत्र्य होते. मुसलमानांशी ऐक्य करण्याचे यावत् शक्य प्रयत्न टिळक, गांधी, नेहरू यांनी केले, पण ते जमले नाही. हिंदुसमाजातही अनेक जातिभेद, पंथभेद, प्रांतभेद होते. पण स्वातंत्र्यलढ्यापुरते ऐक्य घडवून आणण्यात हिंदी नेत्यांना यश आले. ते भेद अजून मिटलेले नाहीतच. केव्हा केव्हा हिंदुस्थानची दक्षिण व उत्तर अशी शकले होतील की काय, अशी भीतीही वाटते. इतर जातिभेदाने शकले झाली नाहीत, तरी राजकारण प्रत्येक वेळा नासते, हे सर्वश्रुतच आहे. स्वतंत्र शिखिस्तान हवे अशी शिखांची मागणी मध्यंतरी पुढे आलीच होती. मुसलमान अजून कोटींच्या संख्येने येथे आहेतच. त्यामुळे राष्ट्रभावना भारतीय जनतेत पूर्णपणे रुजली आहे, असे म्हणणे कठीण आहे. पण स्वातंत्र्य- लढ्यापुरती तरी ती जागी व कार्यक्षम होते, असे दिसते. ब्रिटिशांशी लढताना हे प्रत्ययास आले आणि पुढे पाकिस्तानशी लढे झाले त्या वेळी, विशेषतः १९७१ साली याचा चांगला प्रत्यय आला. तेव्हा तो एक आशेला धागा आहे. पण राष्ट्रनिष्ठा आणि लोकसत्ता ही नवी संस्कृती भारताने आत्मसात केली आहे असे मात्र अजून म्हणता येत नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात जातिभेद, धर्मभेद, प्रांतभेद हे कमी होण्याऐवजी जास्तच चिघळत चालले आहेत असे दिसते आणि याचा अंती परिणाम काय होणार याची चिंता वाटू लागते.