पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२५
राजकारण
 

अलाहाबाद, अजमीर, असे सर्वत्र दौरे त्यांनी काढले. १९१६ साली काँग्रेसचेच काम पुढे चालविण्यासाठी त्यांनी हिंदी स्वराज्य संघ' (होमरूल लीग) याची स्थापना केली व त्याच्या मार्फत चळवळीला सुरुवात केली. होमरूलच्या मागणीसाठी ॲनी बेझंट यांना अटक होताच, हिंदुस्थानातील सर्व प्रांतांतील लोकांनी,' ती मागणी बेकायदेशीर असेल तर आम्ही तीच मागणी जाहीरपणे करीत आहांत व त्यासाठी जाहीरपणे शिक्षा भोगण्यास तयार आहोत,' असा घोष जाहीर सभांतून केला. १८८१ साली टिळकांनी जी बीजे पेरली त्यांना ही फळे आलेली स्पष्ट दिसू लागली. संघटित शक्तीने अन्यायाचा प्रतिकार करण्यास लोक सिद्ध झाले. नवी संस्कृती ती हीच.

ऐक्य-तत्त्वज्ञान
 लोकशक्ती जागृत करणे जितके महत्त्वाचे तितकेच ती शक्ती संघटित ठेवणे महत्त्वाचे आहे, हे राजकारणातले प्रधान तत्त्व टिळकांनी पुरेपूर जाणले होते. त्यामुळेच काँग्रेस अभंग राखण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. १९०७ साली सुरतेला काँग्रेसमध्ये दुफळी झाली. त्या वेळीचे फुटीचे सर्व पातक, मुळात नसताना, आपल्या शिरावर घेण्यास ते तयार झाले होते. पण त्याचा उपयोग झाला नाही. १९०८ सालच्या केसरीच्या लेखांतून त्यांनी ऐक्याचे सर्व तत्त्वज्ञान सांगितले आहे. त्यांनी सांगितले की काँग्रेस ही पार्लमेंटसारखी आहे. तिच्यात पक्षोपपक्ष असणारच व सर्वांना मतस्वातंत्र्य, विचार- स्वातंत्र्य असणारच. पण एकदा बहुमताचा निर्णय झाला की सर्वांनी शिरसावंद्य मानला पाहिजे. पटले नाही म्हणून ज्याप्रमाणे पार्लमेंट कोणी दुसरे स्थापीत नाही, तशीच दुसरी काँग्रेस कोणी काढता कामा नये. हिंदी स्वराज्यसंघ टिळकांनी काढला तरी तो काँग्रेसचे कार्य पुढे चालविण्यासाठीच होय. त्यातर्फे विलायतेस चळवळ केली ती सर्व काँग्रेसच्या मर्यादेत राहूनच केली. १९१६ साली मुसलमानांशी त्यांनी करार केला तो यासाठीच. महात्माजींनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली, तिची त्यांनी प्रशंसा केली. पण ऑ. इं. काँग्रेस कमिटीने मान्यता दिली, तेव्हाच त्यांनी तिला पाठिंबा दिला. अखिल भरतखंडातील सर्व प्रांत, सर्व पक्ष, सर्व धर्म, सर्व वर्ग यांचे ऐक्य घडवून ते काँग्रेसच्या मागे उभे करावयाचे, हे त्यांनी जीवितकार्य मानले होते, आणि मानापमान, कष्ट सोसून यावत् शक्य साधले. कारण ऐक्यावाचून सर्व व्यर्थ होय, हे त्यांनी पुरेपूर जाणले होते.

सत्याग्रह
 लो. टिळक गेल्यानंतर महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे हाती घेतली. त्यांनी जो लढा केला तो 'सत्याग्रह' या नावाने प्रसिद्ध आहे. पण वस्तुतः तो लो. टिळकांचा बहिष्कार व शेवटी सैन्यावर बहिष्कार हीच त्याची प्रधान अंगे होती. शत्रूवर प्रेम आणि अहिंसा हे महात्माजींचे त्याच्या मागे तत्त्वज्ञान होते; पण ते प्रत्यक्षात कधीच आले नाही. इंग्रजांवर प्रेम कधीच कोणी केले नाही. आणि शस्त्रबल