पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७२२
 

जन्य जुटीनेच हा धाकवचका राजांना बसेल', 'आमचे लोकमत आळणी आहे, सरकारवर पगडा बसवण्याइतके सामर्थ्य त्याच्यात नाही.' तेव्हा हे लोकमत जागृत केले पाहिजे, सरकार लाखो लोकांच्या मताला काडीइतकीही किंमत देत नाही, या गोष्टींचा प्रतिकार करण्याचा मार्ग आम्ही काढला नाही तर लोकांचा चळवळीवरचा विश्वास उडून जाईल, तेव्हा लोकमत जागृत करणे हे पुढाऱ्यांचे काम आहे', 'लोकमताचा प्रवाह समुद्रात मिळविण्याची खटपट आम्ही केली नाही तर आमचा देशाभिमान व वक्तृत्व सर्व व्यर्थ आहे,' या टिळकांच्या वाक्यांवरून लोकसत्तेची मूळ शक्ती जे लोकमत ते जागृत करण्याचा ते कसा आटोकाट प्रयत्न करीत होते ते ध्यानात येईल. त्यांच्या आधीचे नेते राम मोहन राय, बाळशास्त्री, रानडे, तेलंग यांचा देशाभिमान कमी नव्हता. पण इंग्रज या देशाचा उद्धार करतील, अशी त्यांची श्रद्धा होती आणि लोकशक्ती जागृत व संघटित करून इंग्रजांना येथून घालवून दिल्यावाचून भारताचा उद्धार होणार नाही, अशी टिळकांची खात्री होती. मूलभूत फरक आहे तो हा.

कष्टकरी जनता
 हे लोकमत म्हणजे कोणाचे मत याचाही विचार असाच नवा व मूलगामी आहे. प्राचीन काळापासून ग्रीक रोमन लोकसत्तांमध्ये लोकसत्ता हे नाव असले तरी शेकडा ९० लोकांचा त्यात समावेश नव्हता. इंग्लंड, अमेरिका या देशांतही शंभर वर्षा पूर्वीपर्यंत कष्टकरी जनतेचा, शेतकरी कामकरी यांचा समावेश 'लोक' या शब्दात नव्हता. राज्यशासनाशी यांचा काही संबंध आहे, असे शास्त्यांना त्या वेळी मुळीच वाटत नव्हते. अशा स्थितीत १८९० सालापासून लोक म्हणजे कष्टकरी जनता, लोक म्हणजे मजूर, शेतकरी, कारागीर, गोष्टी, साळी, माळी, भिल्ल, कातवडी, हे लोक, यांचा उद्धार म्हणजे देशाचा उद्धार, हा लोक शब्दाचा अर्थ टिळक सांगत होते. ही सर्वस्वी नवी दृष्टी होती. त्यापूर्वीच्या जगाच्या इतिहासात असा विचार कधी उद्भवलाच नव्हता. पाश्चात्य देशात तो उद्भवून शंभर एक वर्षे झाली होती. पण प्रत्यक्षात तो आला नव्हता. असा हा विचार सांगून त्या लोकांना लढ्यास उद्युक्त करणे हे महाकार्य टिळकांनी केले. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या संस्कृतीतच, ही नवी गोष्टी झाली. चीन, रशिया, अरब राष्ट्रे, आग्नेय देश येथे अजूनही ती झालेली नाही.
 लोकशक्ती संघटित करून ब्रिटिश सत्तेशी टिळकांनी जो लढा केला त्याचे दोन भाग पडतात. १८९० ते १९०३ पर्यंत एक व त्यानंतरचा दुसरा. पहिला भाग कायदेशीर संग्रामाचा होता, आणि दुसरा कायदेभंग, करबंदी, निःशस्त्र प्रतिकार, बहिष्कार यांचा होता.