पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२१
राजकारण
 

आहेत हा दादाभाईंचा सिद्धान्त त्यांनी अनेक लेखांत विशद केला आहे आणि हा रक्तशोष इंग्रज जाणूनबुजून करीत असल्यामुळे, अर्जविनंत्यांच्या राजकारणाने काही फलप्राप्ती होणार नाही असेच त्यांचे मत होते. कारण, निजलेल्याला जागे करणे शक्य आहे, पण जाग्याला जागे करणे यात काय अर्थ आहे ? असे ते म्हणत. सामाजिक सुधारणेचे ते खंदे पुरस्कर्ते होते. पण आधी, जगणे महत्त्वाचे, मग चांगल्या रीतीने जगणे, असे एका लेखात त्यांनी सांगितले आहे. आधी राजकीय स्वातंत्र्य, मग इतर गोष्टी, असाच याचा अर्थ आहे. विष्णुशास्त्री, टिळक यांच्याप्रमाणेच ते स्वातंत्र्याकांक्षी होते. ब्रिटिश हिंदुस्थानचे कल्याण करतील, यावर त्यांचा काडीमात्र विश्वास नव्हता. एका लेखात ते म्हणतात, 'किती झाले तरी हिंदू लोक धनसंपन्न व ज्ञानसंपन्न झाले, म्हणजे इंग्रज लोक एके दिवशी आपले चंबूगवाळे आवरून चालते होतील, असे कोणीही मानू नये. राज्यशास्त्राप्रमाणे व ऐतिहासिक अनुभवाप्रमाणे, हिंदुस्थानच्या लोकांची अक्कल व ताकद दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जाऊन, इंग्रजांची व त्यांची अधिकाधिक फाटाफूट होऊन, शेवटी घरची मंडळी आगंतुकांना धुडकावून लावणार.' यावर भाष्य करताना जावडेकर म्हणतात, 'इतिहास व राज्यशास्त्र यांच्याकडे परमेश्वरी प्रसादाच्या भाविक चष्म्यातून बघण्याचे युग संपले असून त्यांकडे शुद्ध भौतिक दृष्टीने बघण्याचे युग आता महाराष्ट्रात सुरू झाले असल्याचे, वरील उतारा वाचल्यास, कोणाच्याही लक्षात येईल.' (आधुनिक भारत, १५३)
 या युगाचे प्रवर्तन करण्यात विष्णुशास्त्री, आगरकर व टिळक हे तिघेही सहभागी असले तरी त्याचा सर्व व्याप उभा केला तो लो. टिळकांनी. कारण पहिले दोघे अगदी अल्पायुषी ठरले. आणि हयात असतानाही त्यांनी प्रत्यक्ष कार्य असे काहीच केले नव्हते. तात्त्विक चिंतन करून त्यांनी नवे राष्ट्रीय तत्त्वज्ञान लोकांत प्रसृत केले हे खरे. पण प्रत्यक्ष कृती त्यांच्या हातून काहीच झाली नाही. तेव्हा नवी राजकीय संस्कृती निर्माण करण्याचे श्रेय बव्हंशी लो. टिळकांनाच आहे.

सार्वलौकिक मत
 या नव्या राजगीय संस्कृतीचे पहिले लक्षण म्हणजे संघटित लोकशक्ती हे होय. हे जाणून टिळकांनी 'केसरी'च्या प्रारंभापासूनच त्या प्रयत्नाला सुरुवात केली होती. केसरीच्या दुसऱ्या वर्षाच्या एप्रिल-मेच्या अंकातच या शक्तीचा निर्देश त्यांनी केला आहे. ते म्हणतात, 'इतक्या दिवसांच्या गाढ निद्रेतून अंमळ डोळे उघडून पाहण्याची मनीषा आम्हांला होऊ लागली आहे. परंतु सार्वलौकिक मत म्हणून जो अद्भुत उपाय आहे ज्याला जुलमी राजे व अहंपणाचा तोरा मिरविणारे मंत्रीही भितात- तशा तऱ्हेचे मत अजून आपल्यांमध्ये उत्पन्न होऊ लागलेले नाही.' हे प्रारंभी सांगून टिळकांनी 'लोकमत ही खरी शक्ती आहे' हे तत्त्व सतत लोकांच्यापुढे ठेवले होते.
 'लोकांचा धाकवचका नसल्यामुळे राजे प्रजेस पीडादायक होतात, स्वदेशभक्ति-
 ४६