पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०९
राजकीय कर्तृत्व
 

घराण्याचे राज्य जेमतेम २५|३० वर्षे टिकले. इ. स. १९६७ साली विज्जलाचा वध झाला. त्याच्या मागून आलेले सोमेश्वर, मल्लगी हे राजे दुबळे होते. त्यामुळे राज्यात सर्वत्र अस्वस्थता माजू लागली. कल्याणीच्या चालुक्य घराण्यातील वारसांनी या वेळी पुन्हा उठाव केला होता. पण त्यांच्यांत कर्तृत्व नव्हते. तेव्हा याच वेळी उदयास येत असलेल्या यादव घराण्यातील भिल्लम या पराक्रमी पुरुषाने कलचूरीचा मुलूख जिंकून इ. स. ११८७ साली देवगिरी येथे आपले स्वतंत्र राज्य स्थापिले.

देवगिरी
 यादवांच्या स्वतःच्या निवेदनाप्रमाणे त्यांचे घराणे मूळचे मथुरेचे. यदू हा त्यांचा मूळपुरुष. श्रीकृष्ण मथुरा सोडून द्वारकेस गेले तेव्हा यांचे पूर्वजही तेथे गेले व तेथून पुढच्या काळात केव्हा तरी ते महाराष्ट्रात आले. अर्थात ऐतिहासिक प्रमाण असे याला काही नाही. आणि इतर घराण्यांप्रमाणेच सम्राटपद प्राप्त झाल्यावर यादवांनी आपली नवी वंशावळ तयार करून घेतली असण्याचा पूर्ण संभव आहे. यादवांची एक शाखा जशी महाराष्ट्रात नाशिकच्या परिसरात आली तशीच एक शाखा कर्नाटकात गेली व तेथे तिने द्वारसमुद्र तथा हळेबीड येथे राज्यस्थापना केली. त्या घराण्यातील राजेही आपल्याला यदूचे वंशज मानीत आणि यादवकुलतिलक, द्वारावती- पुरवराधीश या पदव्या लावीत. होयसळ यादव ते हेच. त्यांचा निर्देश वर आलाच आहे.
 देवगिरीच्या यादवांचा इतिहासाला ज्ञात असा मूळ पुरुष म्हणजे दृढप्रहार हा होय. राष्ट्रकुट अमोघवर्ष १ ला याच्या कारकीर्दीत जी अस्वस्थता माजली होती तिचा फायदा घेऊन याने इ. स. ८६० च्या सुमारास नाशिकजवळ चंद्रादित्यपूर नावाची नगरी बसवून तेथे आपले लहानसे राज्य मांडले. अर्वाचीन चांदोर ते हेच होय. त्याचा मुलगा सेऊणचंद्र याच्यावरूनच त्या परिसराला सेऊणदेश हे नाव पडले. याने राष्ट्रकूटांची सेवा करून त्यांच्याकडून सामंतपद प्राप्त करून घेतले. यानंतर या यादवकुळात धडियप्पा, भिल्लम, राजिग, धाडियश, भिल्लम २ रा, ३रा, ४ था, सेऊणचंद्र २ रा, मल्लुगी असे अनेक सामंत झाले. प्रथम ते राष्ट्रकूटांचे व त्यांचा उच्छेद झाल्यावर कल्याणीच्या चालुक्यांचे सामंत होते. या दोन सम्राट घराण्यांशी तीनचार वेळा त्यांच्या सोयरिकीही झाल्या. त्यांनी साम्राज्यविस्तारासाठी केलेल्या बहुतेक स्वाऱ्यांत यादव सामंत आपल्या सैन्यानिशी उपस्थित असत. बहुतेक वेळी मोठा पराक्रम करून 'विजयभरण'सारख्या पदव्या व 'महामंडलेश्वर' पदासारखी अधिकारपदे त्यांनी मिळविल्याचे शिलालेखात उल्लेख आहेत. यातूनच त्यांच्या आकांक्षा वाढत जाऊन चालुक्यराज्य मोडकळीस येताच त्यांनी आपले स्वतंत्र राज्य ११८७ च्या सुमारास देवगिरी येथे स्थापन केले. होयसळ यादव बल्लाळ याने याच सुमारास द्वारसमुद्र येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले. देवगिरी यादवांच्या इतिहासात या होयसळ यादवांशी झालेल्या लढाया हा एक महत्त्वाचा भाग आहे.