पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०७
राजकीय कर्तृत्व
 

 आता या घराण्याच्या कर्तृत्वाचा इतिहास पाहावयाचा. आतापर्यंत वाकाटक, बदामीचे चालुक्य व राष्ट्रकूट यांचे इतिहास आपण पाहिले. त्यावरून असे ध्यानात येईल की या प्राचीन राजघराण्यांच्या इतिहासांचा एक साचा तयार झाल्यासारखे झाले आहे. पूर्वीचे राजघराणे ऱ्हास पावू लागले म्हणजे त्याच्या सामंतांपैकीच कोणी पराक्रमी पुरुष ती संधी साधून उठाव करतो, इतर सामंतांत भेद करून आपला पक्ष प्रबळ करतो व स्वतंत्र राज्य स्थापतो. त्यानंतर त्या घराण्यात कर्ते पराक्रमी पुरुष निर्माण झाले की माळवा, गुजराथ, आंध्र, कांची, चोल, पांड्य, चेर यांवर अधिसत्ता स्थापावी अशी प्रबळ महत्त्वाकांक्षा त्यांच्या चित्तांत निर्माण होते. आणि मग या प्रदेशातील राजघराण्यांशी त्यांच्या अखंड लढाया चालू होतात. त्यात कधी हार, कधी जीत होऊन ही प्रस्थापित सत्ता, कर्ते पुरुष निपजत राहतात तोपर्यंत टिकून राहते. ती मालिका तुटली की तिचा अस्त होतो.

साचेबंद इतिहास
 हा इतिहास असा साचेबंद झाला याचे कारण मुळात तो तसा होता हे नव्हे. तसा तो केव्हाही असणे शक्य नाही. प्रत्येक राजपुरुषाचे कर्तृत्व सारखे किंवा समरूप असणे केव्हाही संभवत नाही. पण त्या काळचा इतिहास तपशिलाने लिहिला गेला नसल्यामुळे सगळ्या घराण्यांचे आजचे इतिहास असे एकसुरी झाले आहेत. आज नाणी, ताम्रपट, शिलालेख आणि क्वचित समकालीन पंडितांनी लिहिलेल्या राजप्रशस्ती यांच्या साह्याने त्या प्राचीन इतिहासाची संशोधक रचना करीत आहेत, आणि ही साधने सर्व एक ठशाची आहेत. दरबारी कवी व इतर आश्रित यांनी रचलेली ही सर्व काव्ये आहेत. ती यापेक्षा निराळी कशी होणार ? पुष्कळ वेळा चालुक्यांच्या कवीने एक लिहावे, तर त्यांचे शत्रू जे पल्लव त्यांच्या कवीने त्याच घटनेचे वर्णन बरोबर उलट लिहावे, असे झालेले आहे. असे आजही घडते. पण आज त्याचा पडताळा घेण्यास अन्य साधने उपलब्ध आहेत. तशी त्या काळच्या इतिहासाची साधने नाहीत. त्यामुळे सर्व घराण्यांचे इतिहास साचेबंद होऊन बसले आहेत. चिनी, आरबी, किंवा युरोपीय प्रवासी त्या काळी येथे मधून मधून येऊन जात. त्यांनी केलेली वर्णने उपलब्ध झाली तर लगेच या साच्याच्या बाहेरचे काहीतरी दिसू लागते आणि इतिहास जरा जिवंत होतो. एरवी या स्वरूपाचा का होईना इतिहास उपलब्ध झाला यावरच समाधान मानून घ्यावे लागते.
 पूर्वीच्या तीन घराण्यांच्या इतिहासासारखाच कल्याणीचे चालुक्य व देवगिरीचे यादव ही जी या कालखंडातील राहिलेली दोन घराणी त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे त्यातील विशेष कर्त्या पुरुषांची माहिती देऊन इतर माहितीचा बराच संक्षेप येथे केला आहे.
 तैलप राज्यावर येताच त्याने साम्राज्यविस्तारास प्रारंभ करून चोल, चेदी, गुजराथचे चालुक्य, परमार राजा वाक्पती तथापुंज, यांवर स्वाऱ्या केल्या व त्यांना नमविले. त्याचा मुलगा सत्याश्रय याने पित्याचेच विस्ताराचे धोरण पुढे चालविले.