पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०५
राजकीय कर्तृत्व
 

वसूल करून गोविंद महाराष्ट्रात परत आला. पण लगेच त्याला दक्षिणेत जावे लागले. गंगवाडी, केरळ, पांड्य, चोल व कांची या राजांनी त्याच्याविरुद्ध मित्रसंघ केला होता. त्यांना कसलाही अवधी न देता गोविंदाने त्यांच्यावर स्वारी करून त्यांची धूळधाण करून टाकली. या वार्तने घाबरून जाऊन सीलोनच्या राजाने आपण होऊन गोविंदाकडे नजराणा व करभार पाठविला. अशा रीतीने हिमालय ते कन्याकुमारी सर्व भारतवर्ष जिंकून गोविंदाने राष्ट्रकूट यशोमंदिरावर कळस चढविला. मौर्य, सातवाहन, गुप्त या घराण्यांच्या तोडीचे हे यश होते. आणि ते एका दक्षिणेतल्या सम्राट घराण्याने मिळविले होते. हे यश संपादल्यानंतर थोड्याच दिवसांत सुमारे ८१३ साली गोविंद मृत्यू पावला.
 गोविंदाचा मुलगा अमोघवर्ष या वेळी अवघा सहा वर्षांचा होता. त्यामुळे सामंत, मांडलिक व पिढ्यानपिढ्यांचे वैरी यांनी एकदम त्याच्या विरुद्ध उठाव केला. पण ही आपत्ती येणार हे ओळखून गोविंदाने गुजरात - राष्ट्रकूट शाखेचा आपला पुतण्या कर्क सुवर्णवर्ष याकडे राज्यकारभार सोपविला होता. कर्काला प्रारंभी यश आले नाही तरी अंती सर्व शत्रूंवर विजय मिळवून त्याने अमोघवर्षाची गादी अबाधित राखली. हा अमोघवर्ष साहित्याच्या दृष्टीने फार प्रसिद्ध आहे. 'कविराजमार्ग' हा त्याचा कानडी भाषेत रचलेला ग्रंथ सुविख्यात आहे. अमोघवर्षाने दीर्घ काळ राज्य केले. पण तो पराक्रमी नसल्यामुळे साम्राज्यविस्तार त्याला करता आला नाही. उत्तर काळात जैनमताकडे त्याचा कल होऊन जिनसेन नामक जैन साधूकडून त्याने उपदेश घेतला होता. पण त्याने सनातनधर्म सोडला होता असे मात्र नव्हे. महालक्ष्मी, सूर्य, महादेव यांवरही त्याची भक्ती होती. मरणसमयी त्याचे वय ८० च्या घरात होते.
 अमोघवर्षानंतर कृष्ण २ रा इन्द्रनित्यवर्ष ३ रा, अमोघवर्ष २ रा, गोविंद ४ था, अमोघवर्ष ३ रा, कृष्ण ३ रा व खोट्टिग अमोघवर्ष ४ था असे राजे राष्ट्रकूट घराण्यात होऊन गेले. बहुतेकांच्या राजवटी गंग नोळंबवाडी, वेंगीचे चालुक्य, कनोजचे गुर्जर प्रतीहार, कलचूरी (चेदी ), पांड्य, केरळ, चोल यांशी झालेल्या लढायांनी भरलेल्या आहेत. या लढायांत इन्द्र ३ रा, कृष्ण ३ रा यांनी घराण्याच्या नावाला साजेसे पराक्रम केले. पण एकंदर घडामोडीत नित्याच्या साच्याहून निराळे असे काही झाले नाही. शेवटचा राजा खोट्टिग अमोघवर्ष याच्या कारकीर्दीत तैल नावाच्या सामंताने उठाव करून राष्ट्रकूट घराण्याचे राज्य बुडविले (इ. स. ९७३ ) व पुन्हा चालुक्य घराण्याचे राज्य स्थापिले तैल हा बदामीच्या चालुक्यांपैकीच असावा असा पंडितांचा तर्क आहे.

राजपुरुष-परंपरा
 राष्ट्रकूट घराणे हे पराक्रमी पुरुषांचे घराणे होते. पंजाब व सिंधू हे दोन प्रांत सोडून सारा भारतवर्ष त्यांनी पादाक्रांत केला होता. हिमालयापर्यंत त्यांनी आपल्या सेना