पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्थांची अपुरी संख्या, शासनाची बालकल्याणकारी कार्यावर सतत कमी-कमी होत जाणारी आर्थिक तरतूद. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर राज्यातील पाच लक्ष वंचित, उपेक्षित बालकांपैकी अवघ्या तीस-पस्तीस हजार, बालकांची वणवण केवळ चिंताजनक! ज्या अनाथाश्रम सदृश संस्था आहेत तिथे किमान भौतिक नि भावनिक समृद्धीचा आपण आग्रह धरायला हवा.
 माझा जन्म अनाथाश्रमातच झाला. मी जगलो, वाढलो, रांगलो, चालायला लागलो पंढरपूरच्या आश्रमातच. पुढे कुमार वयाचा झालो नि कोल्हापूरच्या रिमांड होम मध्ये गेलो. तिथे चक्क एस्.एस्.सी. पर्यंत शिकलो. पुढे कॉलेज संस्थेमार्फत केलं. परगावी-गारगोटीस राहून मौनी विद्यापीठात. सुट्टीत रिमांड होम मध्येच राहायला लागायचं. त्या काळातही चम्मन, हाफ पँट चुकली नव्हती असं चांगलं आठवतं. पुढे मुदत संपली नि क्षणात माझा नि संस्थेचा संबंध संपला. एकदम खाली जमीन नि वर आकाश. अनाथ होतोच पण या निष्ठुर संबंधविच्छेदाने त्या अनाथपणाची, आपलं कोणीही नसल्याची प्रकर्षाने जाणीव झाली ! सुदैवाने परिस्थितीनं जागं केलं. मी जगलो. झगडलो. शिकलो. स्वावलंबी झालो. नोकरी करत शिकत राहिलो. बी.ए., बी. एड्., एम्.ए., पीएच्.डी. झालो. जे भोगलं त्यानं माझ्या मनाची नाळ पक्की बांधलेली. काही झालं तरी ही कोंडाळी स्वच्छ करायची ! हे कोंडवाडे उघडायचे ! तेथील मुलं-मुली सामाजिक कोंदणाचे हिरे, माणकं व्हावीत असं स्वप्न घेऊन काम करू लागलो. कोल्हापूरचे रिमांड होम ‘बालकल्याण संकुल' केलं. उपेक्षितांचं स्वराज्य, वंचितांचं नंदनवन केलं. महाराष्ट्रातील अशा सर्व संस्था, योजना चांगल्या कशा होतील म्हणून महाराष्ट्र पिंजून काढला. बघता येतील, बदलता येतील तेवढ्या संस्था बघितल्या, बदलल्या. या सर्व राज्यभरच्या संस्थांचा अध्यक्ष झालो. शासनानेच अध्यक्ष म्हणून नेमलं. शासन दरबारी अहवाल सादर केले. युरोप, आशियातील पंधरा एक देशांना भेटी दिल्या, त्या अनुभवावर समाज सेवेत लिहिलं. अनेक ठिकाणी बोललो. पण हाती फार कमी राहिलं, कमी आलं.

 रिमांड होम, अनाथाश्रमासारख्या संस्था खरं तर बालक हक्कांच्या संरक्षणाची हमी केंद्र असायला हवीत. मला आठवतं, १९८९ ची गोष्ट असावी. ‘बाल न्याय अधिनियम-१९८६'ची अंमलबजावणी महाराष्ट्रात नुकतीच झालेली. येथील

९४...कोंडाळे, कोंडवाडे नि कोंदण