पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोडली जातात. समाजाच्या लेखी ती म्युनिसिपालटीच्या कच-यासारखी असतात. माणसांनी (ती सहृदय असल्याने!) त्यांना हात नसतो लावायचा. फक्त वर्दी द्यायची असते म्हणे! ती पण निनावी हं! नसतं लफडं मागं नको. मग पोलीस येतात नि त्यांना अर्भकालय, अनाथाश्रम, बालकाश्रमात -कोंडाळ्यात दाखल करतात. या साच्या प्रवासात बरीच दगावतात. ज्यांची दोरी बळकट ती मुले कोंडाळ्यातून कोंडवाड्यात येतात. कोंडवाडेही सामाजिक असतात म्हणे! अनाथाश्रम, रिमांड होम, बालगृह,आश्रमशाळा, महिलाश्रम अशा संस्था म्हणजे आपल्या समाजातील कोंडवाडेच ना? अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, हरवलेली, सापडलेली, घरातून पळून आलेली, टाकलेली, मुलं-मुली या संस्थात येतात. या संस्थांचे चित्र कोंडवाड्यापेक्षा वेगळं असतं म्हणणं धाडसाचं ठरावं! काही सन्माननीय अपवाद जरूर आहेत, पण अपवादांनी नियम अधिकच सिद्ध होतो. उंचच उंच तुरुंगसदृश भिंती, बंद दरवाजे, करडी शिस्त हसण्या-खेळण्यास मज्जाव, जागेपेक्षा अधिक मुलं नेहमीच भरलेली (म्हणून तर ते कोंडवाडेच !) निष्ठुर अधिकारी, व्यक्तिमत्त्व व विकासाचे नाव नाही. एकरंगी पोषाख, सामुदायिक मौजीबंधन असावं असे केस, कुबट दुर्गंधी, अस्वच्छ स्वयंपाकघरं नि भांडी, अस्वच्छ, तुंबलेल्या मुताच्या, न्हाणीघरं, संडास, कुबट अंथरुणं, निकृष्ट दर्जाचं धान्य नि सर्वांत वाईट म्हणजे अमानुष वागणूक व रोजचे मानसिक ओरखडे !
 या सर्वांचं तुम्हाला काहीच सोयरसुतक नाही.... व्यक्ती, समाज, शासन, संस्था, संघटना, पक्ष कुणालाच नाही! कारण तुम्ही अनाथपण, वंचितपण भोगलेलं नाही. माहीत असून भिडायचं धाडस नाही. समाजाचा संवेदी सूचकांक निष्क्रिय नि शून्य असतो हेच खरं! यात कधीतरी प्रासंगिक, क्षणिक चढउतार येतात तेवढेच! भाऊबीज, रक्षाबंधन, दिवाळीस (उरलेल्या फराळ, फटाक्यांचं काय करायचं?) हा सूचकांक चढतो! इतर वेळी शून्य ! निष्क्रिय !!

 ही कोंडाळी नि कोंडवाडे कोंदणं कशी होतील, घरं, मुक्त मनं कशी होतील याचा ध्यास घ्यायला हवा. आपल्या देशात सुमारे दोन कोटी मुलं-मुली अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, बालमजूर अशा अनेक कारणांनी वंचित नि उपेक्षित आहेत. तर खरं तर त्या सर्वांना संस्थात्मक आधार, संगोपन, पुनर्वसन सुविधांची गरज आहे. पैकी १०% मुलांना देखील हा आधार मिळत नाही. त्याचं कारण

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...९३