पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कोंडाळे, कोंडवाडे नि कोंदण


 गल्लीच्या कोप-यावर म्युनिसिपालटीचं कोंडाळं असतं. त्यात लोक आपल्या घरचा केरकचरा आणून टाकतात. त्याचा होतो उकिरडा. घरात-समाजात किती घाण भरलेली असते ते हे कोंडाळे बघितलं की लक्षात येतं. याचं एक वैशिष्ट्य असतं. हे भरतो आपण, पण ते उचलायचं असतं म्युनिसिपालटीनीच. तिनं उचललं नाही तर प्रसंगी नाक धरू गुदमरेपर्यंत, पण आपण हात नाही लावणार! कोंडाळे म्युनिसिपालटीचं असतं ना!
 प्रत्येक गावात अशी कोंडाळी असतात तसे कोंडवाडे पण. हे असतात ग्रामपंचायतीचे, नगरपालिकेचे नि महानगरपालिकेचे पण जेवढं गाव मोठं तेवढा कोंडवाडाही मोठा. गाव छोटं असेल तर एखादा, मोठं असेल तर अनेक. मोकाट फिरणारी, सोडलेली, टाकलेली, चुकलेली, पिसाळलेली, रोगग्रस्त, निराधार, भटकी जनावरं इथं डांबली जातात. त्यांचे पुढे काय होतं म्हणाल तर काही उपाशी मरतात, काही कसायाला विकली जातात. काहींचा लिलाव होतो. जी कसायाकडे जातात, त्यांची कत्तल होते. काहींना विष घातलं जातं. फार कमींचा सांभाळ, संगोपन होतं. पुनर्वसन मात्र अपवादानंच! कोंदण ही कविकल्पनाच म्हणायला हवी. कोंदण असते एक रचना. सौंदर्य वाढविणारी हिरे, माणके, पाचू कोंदणात बसतात. कोंदण असतं चांदी, सोन्याचं. ते हिच्या-माणकांचे संरक्षण करतं. ते त्यांचं सौंदर्य वाढवतं नि मूल्यही! ते नक्षीदार, मनमोहक असावं म्हणून कारागीर किती मेहनत घेतात! जीव पणाला लावतात. लोक प्राणाची बाजी लावून ते खरेदी करतात, हस्तगत करतात.

 अशीच सामाजिक कोंडाळी, कोंडवाडे नि कोंदणंही असतात बरं का! अनाथ, अनौरस, बेवारस अर्भकं, बालकं कचरा टाकावा तशी उकिरड्यात, रस्त्यावर, शौचालयात, स्टॅडवर, स्टेशनवर, रेल्वेच्या डब्यात, एस. टी.त, देवळात टाकली

९२...कोंडाळे, कोंडवाडे नि कोंदण