पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्व वेदनांचे मूळ जाणिवेचा अभाव हेच आहे. अनाथांचे कल्याण, संगोपन, संवर्धन हे एक शासकीय कार्य आहे अशी जोवर आपली समजूत राहील तोवर या वेदना अशाच राहणार आहेत. समाजात अनाथाश्रमांची संख्या वाढणे ही भूषणास्पद गोष्ट खचितच नाही. अशा संस्था समाजजीवनात विसर्जित होणे, हे या वेदनेवरचा रामबाण उपाय आहे. त्यासाठी व्यक्तिगत जीवन नैतिक होणे, समाज मानस डोळस होणे गरजेचे आहे. प्रबोधन, परिवर्तनाशी नाते सांगणाच्या सर्व संस्था, संघटनांनी उपेक्षितांच्या या शापित वेदनांशी संवाद साधायला हवा. यासाठी चर्चा, शिबिर, भाषणे, भेटी, सप्ताह साजरे करण्यासारखे सवंग कार्यक्रम घेणे टाळावे. शक्य असल्यास या मुलांना प्रेम द्या, शिकवा, नोकरीस मदत करा, विवाहास पुढे या, मुले दत्तक घ्या. कृपया शिष्यवृत्त्या, सवलती इत्यादींच्या कुबड्या देऊन अनाथांना अपंग करू नका, अनाथ, उपेक्षित जन्माने, परिस्थितीने जिद्दी असतात. त्यांना गरज असते फक्त अनुकूल वातावरणाची, धीराची, संधीची. ती द्याल तर वेदनेचं हे खग्रास खण्डग्रास व्हायला प्रत्यवाय असू नये. संपूर्ण ग्रहण मोक्षाची कल्पना रम्य असली तरी प्राप्त परिस्थितीत ते स्वप्नरंजन ठरेल. म्हणूनच खण्डशः का असेना, या वेदना जसजशा कमी होतील तसे अनाथ, उपेक्षितांचे हे जीवन अधिक सुंदर, अधिक संपन्न होईल. आपण तशी आशा करू नि स्वतःपासून या शुभकार्याचा प्रारंभ करू.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...९१