पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येईल की, आपल्या शरीराशिवाय या वर्गाकडे काही असतच नाही मुळी. शिवाय अनौरस, उपेक्षित, अनाथ म्हणून समाजाच्या विकृत मनोवृत्तीचे हे कायम बळी ठरतात ती गोष्ट निराळीच.
 अशी अनाथ, उपेक्षित, बेवारस, अनौरस मुले-मुली या समाजात प्राचीन काळापासून जन्म घेत आली आहेत. ही परंपरा कर्ण, शकुंतला, दुष्यंत, विश्वामित्र इ. चरित्राइतकी प्राचीन आहे. आजच्या विज्ञानयुगात मुक्त संभोग, लैंगिक शिक्षण प्रसार, प्रेमविवाह, वाढता स्वच्छंदीपणा इत्यादीमुळे अशा मुला-मुलींची संख्या भूमिती पटीने वाढत आहे. उलटपक्षी या मुलांच्या वेदनांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन पारंपरिक, स्थितिशील नि स्थैर्यशील असल्याने या वेदना तीव्रतर होत गेल्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात देशात नि राज्यात अनाथाश्रम, सुधारगृहे, रिमांड होम इ. संस्था वाढल्या आहेत असे शासकीय सत्य (?) पुढे करून हा देश, हे राज्य लोककल्याणकारी आहे असा डांगोरा पिटला जातो आहे. लोककल्याणकारी राज्य नि समाजव्यवस्थेत वेदनांची उतरती भाजणी असते, असे गृहीत धरले तर वेदनांचा चढता आलेख काय सांगतो हे विचार करण्यासारखे आहे.
 अनाथ, उपेक्षितांच्या वेदनेची सुरुवात जन्मापासून होते नि स्वावलंबी बनेपर्यंत कायम असते. या स्वावलंबनापर्यंतच्या प्रवासात पालन-पोषण, शिक्षण, जडणघडण, नोकरी, विवाह, समाज- मान्यता, पुनर्वसन इत्यादी समस्या क्षणोक्षणी आ वासून उभ्या असतात. प्रस्थापित समाज व्यवस्थेत अनाथांचा विकास हा दया नि करुणेवर अवलंबून असल्याने त्यांचे विकसित जीवन हे नेहमीच कृतज्ञतेच्या कुंपणाने घेरलेले असते. अनाथाचा विकास झाला तरी मुक्त श्वास तो घेऊ शकत नाही, हे त्याच्या वेदनेचे खरे शल्य आहे. दुर्दैवाने या शल्याची चिकित्सा आमच्या पुरोगामी समाजजीवनात अद्यापही झालेली नाही. आमच्या समाजप्रबोधनाची ती एक शोकांतिका आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.

 अनैतिक शरीर संबंधातून जन्माला आलेली, दारिद्र्यामुळे आई-वडिलांना नकोशी वाटणारी, आपत्तीत आई-वडील वारल्याने अनाथ झालेली, संसर्ग नको म्हणून (महारोगी इत्यादी) आई-वडिलांपासून दूर झालेली, चुकलेली, टाकलेली अशी सर्व मुले-मुली अनाथ, उपेक्षित या संज्ञेत गृहीत आहे. शिवाय यात

८८...अनाथ, उपेक्षितांच्या वेदना