पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनाथ, उपेक्षितांच्या वेदना


 वेदनेच्या नेमक्या वर्मावर बोट ठेवून तिचे विच्छेदन, विश्लेषण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न समाजजीवनात अपवादानेच केला जातो. ब-याचदा सामाजिक प्रबोधन, उद्बोधनाच्या नावाखाली वेदनांवर फुका कुंकर घालण्याचेच नाटक होत असावे. परिणामी सामाजिक वेदना, व्यथा आहे तशाच राहतात. कालपरत्वे वैचारिक वादळांची धूळ क्षणभर उठते नि परत समाजजीवन पारंपरिक पद्धतीने कार्यरत राहते. अनाथ, उपेक्षितांच्या वेदनांच्या संदर्भात हे सत्य पडताळून पाहता येण्यासारखे आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा प्रांत आहे, असे सांगत असता म. फुले, डॉ. आंबेडकर, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे इत्यादी समाजसुधारकांची लांबलचक यादी दिली जाते. आपले पुरोगामित्व नि समाजसुधारणेबद्दलच्या कल्पना या खरं तर रूढ, पारंपरिक असतात. समाजात हरिजनांशिवाय भयंकर समस्या असूच शकत नाही अशी समाजमानसात असलेली धारणा (गैरसमजूत) या रूढ नि पारंपरिक उदाहरण म्हणून सांगता येईल. हरिजनांच्या वेदना तीव्र आहेत याबद्दल दुमत असायचे कारण नाही. पण त्याहीपेक्षा तीव्रतर वेदना असलेल्या अनाथ, उपेक्षितांबद्दल अधिक जाणिवेने लिहायला, बोलायला नि करायला या समाजात लोक सापडत नाहीत. परिणामी अनाथ-उपेक्षितांच्या वेदना भूमितीच्या पटीने वाढत आहेत याकडे समाजसुधारकांचे हवे तितके लक्ष गेले नाही ही वस्तुस्थिती आहे नि म्हणूनच हा लेखप्रपंच.

 अनाथ, उपेक्षितांच्या वेदनांची तुलना हरिजनांशी करत असताना एक गोष्ट लक्षात घेणे क्रमप्राप्तच काय पण आवश्यकही आहे. हरिजनांना गावकुसाबाहेर का असेना छप्पर असतं, दाखवायला का असेना आई-वडील असतात, पिकत नसली तरी जमीन असते, सांगायला का असेना जात, धर्म असते- यातले अनाथ, उपेक्षितांकडे काय असते? एवढ्या साध्या तुलनेने तुमच्या असे लक्षात

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...८७