पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांचे दत्तक जाण्याचं प्रमाण अलीकडे वाढले असले तरी एकूण गरजू मुलांची संख्या पाहता ते नगण्य आहे. अशी पूर्ण अनाथ मुले/मुली १८ वर्षांपर्यंत संस्थेत राहतात. बाल गुन्हेगार बालकांचा अवधी अनाथ मुलांच्या तुलनेने कमी असतो. प्रासंगिक घरगुती कारणांनी येणारी मुले अल्प काळ संस्थेत असतात. या कालावधीत मुलामुलींच्या संगोपन, संस्कार, शिक्षण, स्वावलंबन, स्वभाव, वृत्ती, सवयी संदर्भात वेगवेगळे परिणाम होतात.
 (१) दुष्परिणाम
 १) संस्थेमधील मुलांची संख्या लक्षात घेता कर्मचारी कमी असतात. परिणामी मुलांचे संगोपन, व्यक्तिविकास, आवड-निवड, संस्कार, हवं-नको याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते.
 २) बालवयात जेव्हा मुलांना मातृत्वाची ऊब व पितृत्वाचा आधार आवश्यक असतो अशा काळात मुलं दुर्लक्षित राहिल्याने त्यांच्या शरीर, मन नि भावविश्वाचा संतुलित विकास होत नाही.
 ३) पालकत्वाची गरज असलेल्या काळात मुलं दुर्लक्षिली गेल्याने एकलकोंडी, उदास, अंतर्मुख असणारी बनतात.
 ४) संस्थात्मक संगोपनात परिपाठी/दिनक्रमात तोच तोपणा असल्याने मुलं यंत्रवत वागतात.
 ५) बालवयात सुप्त गुणांच्या विकासास अधिक वाव असतो. व्यक्तिगत दुर्लक्षामुळे सुप्त गुणांच्या विकास व आविष्कारास संधी मिळत नाही.
 ६) शिक्षणात मुले मागे पडतात. कारण संस्था व प्रोत्साहन देण्याची व्यवस्था नसते.
 ७) संस्थागत संगोपन हे संस्था प्रशासनाचे अंग समजले गेल्याने दंड, शिक्षा यांच्या दुष्टचक्रात मुलांच्या विकासाच्या ऊर्मी करपून जातात. मुलं सतत मॉनिटर, काळजीवाहक, अधिकारी यांच्या भीतीच्या सावटाखाली वाढल्याने निराश नि उदास राहतात.

 ८) व्यक्तिगत आहाराकडे लक्ष नसल्याने मुलांमध्ये जीवनसत्त्वांची कमतरता राहून मुले अशक्त, रोगग्रस्त राहतात.

८४...दीर्घकालीन संस्थात्मक बालसंगोपनाचे परिणाम