पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 संस्थेची जागा
 संस्थेची जागा शहरी गलबलाट व गलिच्छतेपासून सुरक्षित परंतु बालकांच्या गरजा लक्षात घेता सोयीच्या ठिकाणी असावी. ती निसर्ग समृद्ध, दळणवळण मार्गास जोडणारी, संपर्क सुविधा युक्त असावी. ती वस्तीलगत असावी. आवश्यक सुविधा, शाळा, दवाखाना, बँक, पोस्ट, टेलिफोन, एक्स्चेंज, रेडिओ स्टेशन, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सांस्कृतिक केंद्रे यांच्याशी सहज संपर्क साधता येईल इतक्या अंतरावर परंतु सुरक्षित असावी.
 संस्थेची इमारत
 संस्थेच्या इमारतीची रचना बालककेंद्री असावी. संस्थेची इमारत स्वतःची व स्वतःच्या जागेवर हवी. लाभार्थी संख्येवर आधारीत मुलांचा वयोगट, गरजा लक्षात घेऊन तिचा आराखडा तयार करण्यात यावा. इमारतीत कार्यालय, निवास, भोजन, रंजन, क्रीडांगण, अभ्यासिका, प्रसाधनगृहे, भांडार, ग्रंथालय, प्रशिक्षण केंद्र, कर्मचारी निवास इ.ची सोय असावी. या सोयी वास्तुशास्त्रानुसार वैज्ञानिक व पुरेशा हव्यात. इमारत हवेशीर, प्रकाशयुक्त व पर्यावरणगामी असावी. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या विकास व वापरावर भर असावा.
 आरोग्य सुविधा
 संस्थांच्या आरोग्य समृद्धीसाठी नियमित स्वच्छता, रंगरंगोटी, दुरुस्ती, प्रसाधनगृहांची पुरेशी संख्या, भरपूर पाणीसाठा, आरोग्य शिक्षणाची सोय इ.बाबत प्राधान्याने विचार व्हावा. डॉक्टर नर्स, सफाई सेवक याबरोबर मुलांमध्ये स्वच्छता संस्कार व सवयी विकसित करण्यावर भर द्यावा. त्यासाठी जंतुनाशके, साबण, कपडे, ब्रश इ. वस्तू पुरेशा प्रमाणात निरंतर मिळतील, असे पाहावे. संस्थेचे एकंदर वातावरण प्रसन्न व आरोग्यसंपन्न हवे.
 लाभार्थी सुविधा

 लाभार्थीच्या व्यक्तिगत वस्तू पुरविणे, त्यांची सुरक्षा, निगा, वापराचे संस्कार देणे आवश्यक आहे. आज संस्थांत याबाबत सामूहिक व्यवस्था असते. ती व्यक्तिगत हवी. प्रत्येक मुलास स्वतःचे कपडे, गणवेश, ठेवणीतले कपडे, कंगवा, आरसा, नेलकटर, नॅपकिन्स, डिश, ब्रश, बिछाने, पादत्राणे, स्वेटर्स, रेनकोट इ. पुरविणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...७९