पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आता संस्थाबाह्य सेवांचे आंदोलन सुरू झाले पाहिजे. प्रवेश ते पुनर्वसन या सर्व स्तरावर संस्थाबाह्य सेवांची आवश्यकता वेगळ्या शब्दात सांगायची गरज उरलेली नाही.
 अपेक्षित बदल
 विद्यमान संस्था व ह्या संस्थांतून मुलांना मिळणाच्या सेवात गुणात्मक वृद्धी व्हायची असेल तर संस्था, शासन, समाज, अधिकारी, कर्मचारी, कार्यविषयक दृष्टिकोन इ.मध्ये आमूलाग्र बदल व्हायला हवा. त्या संदर्भात काही गोष्टींचा ठळकपणे उल्लेख करता येईल.
 (१) विद्यमान संस्थांच्या किमान दर्जा व सुविधांविषयी धोरणात्मक गोष्टी निश्चित व्हायला हव्यात.
 (२) शासनाने किमान सुविधांबाबत आग्रही राहायला हवे.
 (३) संस्थांतील सामूहिक आचार उपचाराजागी व्यक्तिचिकित्सा, व्यक्तिगत लक्ष व व्यक्तिगत विकासाचे तत्त्व स्वीकारायला हवे.
 (४) राज्यात प्रवेश ते पुनर्वसन पातळीवर बालगुन्हेगार व अनाथांसाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा व जाळे विकसित करायला हवे.
 (५) संस्थानिहाय कार्यपद्धती, उपचार, सुविधा निश्चित व्हायला हव्यात.
 (६) मुलांच्या संस्थेवर आधारित कर्मचारी/अधिकारी सूत्र लागू होणे आवश्यक आहे.
 (७) योजनांची द्विरुक्ती व सुविधांची विषमता दूर व्हायला हवी.
 (८) अनुदान पद्धतीत बदल आवश्यक.
 (९) बालसंगोपन व पुनर्वसनाच्या पारंपरिक पद्धतीशिवाय दत्तक, प्रतिपालन, सांभाळ, साहाय्य इ. उपायांची अंमलबजावणी व्हायला हवी.

 (१०) सर्व कार्याचा केंद्र ‘बालक' असायला हवे.

७६...बालकल्याण संस्था : स्वरूप, कार्य व बदल