पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कर्मचारी वर्गाची उदासीनता
 मुलांच्या संख्येच्या प्रमाणात काळजीवाहक कर्मचारी नसणे, कार्यालयीन कामाकरिता शिपाई वर्ग नसणे, माळी, सफाई कामगार, चौकीदार यांसारखी पदेच अस्तित्वात नसणे यामुळे अधिकारी व कर्मचा-यांच्या मर्यादित संख्येच्या बळावर अमर्याद व आकांक्षी सेवांची परिपूर्ती आज अशक्य झाली आहे. शिवाय कर्मचा-यांचे स्वतःचे असे सेवाशर्ती, वेतनश्रेणी, सेवानिवृत्ती योजना इ. प्रश्न आहेत. परिणामी कर्मचारी हे बालकांच्या हृदयाचा ठाव घेण्यात अपयशी असल्याचे चित्र आहे.
 कर्मचारी प्रबोधन व प्रशिक्षण
 या सर्व समस्यांवर कर्मचारी प्रबोधन व प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपाय सुचविला जातो खरा. पण तो अल्पकाळ परिणामी ठरला आहे. जोवर कर्मचारी वर्गाच्या समस्यांचे समूळ उच्चाटन आपण करणार नाही तोवर प्रबोधन/प्रशिक्षण हे उपाय मलमपट्टीच होऊन राहतील.
 लाभार्थी गणिक गुंतवणूक
 आज १०० मुलांच्या संस्थेचा वेतन व वेतनेतर खर्च मिळून साधारणपणे वार्षिक खर्च ७ लक्ष ५० हजारांच्या घरात आहे. शिवाय इमारत आदी रचना उभारणी व देखभालीवर १ लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याचाच अर्थ असा की, आपण एका मुलावर साधारपणे १० हजार रुपये वर्षाला खर्च करतो. यापैकी आस्थापना व्यवस्थेवरील खर्च हा २५%अनुत्पादित व घरात जातो. भारतासारख्या गरीब देशात २५% अनुत्पादित व अलाभकारी खर्च करणे परवडणारे नाही. शिवाय संस्थाश्रयी उपचार पद्धती जगभर अशास्त्रीय, असामाजिक व कालबाह्य मानली गेली असल्याने गतिशील सामाजिक सहभागाचा अपव्यय टाळण्यासाठी संस्थाबाह्य सेवांचा पुरस्कार करणे आवश्यकच नाही तर अनिवार्यही झाले आहे. शिवाय व्यक्तिनिहाय नैसर्गिक व्यक्ती विकासासाठी संस्थाबाह्य सेवाच उपाय आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.
 संस्थाबाह्य सेवांचा पुरस्कार

 प्रतिपालन, दत्तक, आर्थिक पुनर्वसन, इ. संस्थाबाह्य सेवांचा पुरस्कार काळाची गरज असल्याने वर्तमान संस्थांच्या विसर्जनाची प्रक्रिया म्हणून या संस्थांतूनच

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...७५