पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाल्यासारखीच सद्यःस्थिती आहे. संस्थांचे कागदोपत्री वर्गीकरण करून कायद्यामागील भूमिका अमलात येत नाही तर त्यानुसार संस्था कार्यपद्धतीत बदल, कर्मचारी नियुक्ती, अनुदान वाढ, उपचार पद्धतीत बदल, या गोष्टी व्हायला हव्यात.
 संस्था व शासनाचे कार्य

 यासाठी संस्था व शासनास बरेच करता येण्यासारखे आहे. पूर्वी स्वयंसेवी संस्था एखादी योजना गरजेतून सुरू करायच्या. नंतर त्यास शासकीय मान्यता मिळायची. आज परिस्थिती बदलली आहे. समाजातील कल्याण व विकास कार्य हे अनुदानावर्ती झाल्याने आज संस्थात्मक कामाचा दर्जा उंचावण्याच्या कार्याचा प्रारंभ शासनाकडून झाल्यास राज्यभर त्याचा प्रचार व प्रसार होईल. बालकल्याण संस्थांच्या किमान दर्जाबाबत नियमावलीत निर्देशित करण्यात आलेल्या शर्ती शासनाने संस्थांवर अनिवार्य केल्या पाहिजेत. अशी अनिवार्यता व्यक्त केल्याशिवाय संस्थांची भौतिक समृद्धी वाढणार नाही. बालकल्याण संस्थांना निवास, भोजन, शिक्षण इतक्या किमान सुविधा व संधी पुरविणे म्हणजे संस्थेचा किमान दर्जा होत नाही. बालकांच्या भौतिक, भावनिक, विकासाच्या सर्व त्या सुविधा व संधी पुरविणे म्हणजे किमान दर्जा राखणे आहे, याचे भान संस्थांना होणे आवश्यक आहे. भोजन, निवास व शिक्षणाच्या किमान तरतुदीशिवाय संस्थांत ग्रंथालय, वाचनालय, शुश्रूषा केंद्र, क्रीडांगण, रंगमंच, मनोरंजन केंद्र, दृक-श्राव्य केंद्र, रेडिओ, दरदर्शन, जिमखाना या सोयी हव्यात. मुलांचे दप्तर, बिछाने, व्यक्तिगत साहित्य ठेवणे इ.च्या सोयी हव्यात. पुरेसा काळजीवाहू वर्ग उपलब्ध व्हायला हवा. दैनंदिन पर्यवेक्षण व निरीक्षणाचा परिपाठ असायला हवा. मुलांना बोलण्या-लिहिण्याच्या तसेच सर्व प्रकारच्या खुल्या अभिव्यक्तींचे अनुकूल वातावरण हवे. किमानपक्षी ज्याला फारसे अर्थबळ लागणार नाही असे उपक्रम आयोजण्यावर भर हवा. संस्थात्मक चौकट मोडून संस्था घर-पर्यायी घर कसे होईल, हे पाहायला हवे. शासनाने उपक्रमशील संस्थांत नियमांचा बाऊ करून तेथील वातावरण नियंत्रित करू नये. निरीक्षण पद्धतीतील शासकीय रूक्षता कमी कशी होईल, हे पाहायला हवे. निरीक्षण हे हिशोब व कागदपत्रांचे न होता मुलांना दिल्या जाणाच्या सुविधा, संधीचे व्हायला हवे. त्यासाठी मुलांशी सहज संवाद,

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...७३