पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाळे ब्रिटिशांनी निर्माण केले. येथील कार्य आजही ब्रिटिश पद्धतीने चालते. इंग्लंडने आज जगात एक नवा इतिहास निर्माण केल्याचे मी पाहिले. तिथे आज अनाथाश्रम, बालगृहासारख्या संस्थाच अस्तित्वात नाहीत. त्या संस्था त्यांनी जाणीवपूर्वक समाजात विसर्जित करून टाकल्या आहेत. याचा अर्थ, तिथे हे सामाजिक प्रश्न संपले असे नाही. पण सोडविण्याचे ठिकाण संस्था नाही तर समाज आहे. अनाथ मुलगा मिळाला की तो एका कुटुंबाकडे पैसे देऊन सांभाळायला दिला जातो. तेथून त्याला एखाद्या कुटुंबात दत्तक दिले जाते. हीच गोष्ट बालगुन्हेगारांची व बलात्कारित भगिनींची. समाजात सर्व त-हेचे परिवर्तन होऊ शकते. त्यासाठी गरज असते जाणीव जागृतीची व जबाबदारीचे भान यायची. उपेक्षित बालकांचे पालकत्व समाजाने स्वीकारायला हवे. या संस्था समाजात विसर्जित होण्याची प्रक्रिया तेव्हाच सुरू होईल जेव्हा समाजातील प्रत्येक माणसाच्या हृदयात या संस्था घर करतील. त्यासाठी अशा संस्थांमध्ये प्रयत्नपूर्वक डोकावायला हवं. या संस्थांत पाहण्यासारखे काहीच असत नाही. अनुभवण्यासारखे मात्र बरेच असते. एक तरी ओवी अनुभवावी या न्यायाने अशा संस्थांमध्ये जाऊन एकदा तरी तेथील मुलामुलींचे विश्व समजून घेतले पाहिजे.

 गेली दहा-बारा वर्षे राज्यातील अशा अनेक संस्थांच्या कार्याशी संबंध आला. या काळात दत्तक, शिक्षण, प्रशिक्षण, नोकरी, विवाह इ. माध्यमांतून बालगृहास समाजात जपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. पोटचं मूल आंधळे निपजलं म्हणून सोडून दिलेल्या आईच्या पदरात तिचा मुलगा डोळस करून घालता आला. दोन्ही हातपाय लुळे असलेल्या मुलास स्वतःच्या जन्मजात मुली असलेल्या एका संवेदनशील दांपत्याने दत्तक घेताना मी पाहिले. संस्थेतील एका बलात्कारित होऊन कुमारी माता झालेल्या अवघ्या सोळा वर्षांच्या मुलीची तगमग सावरून तिला विवाहित करताना केलेली धडपड आठवते. सुट्टीसाठी आई नेत असताना घरी न जाणारी मुलं प्रत्यही आढळतात. हे सारं तुरुंगसदृश संस्थांत कसं घडू शकेल? कधी काळी उंच भिंतींच्या गराड्यात उभारलेली बालगृहे आज बाह्यतः तशीच दिसत असली तरी आता तिथे माणुसकीचे पाझर फुटले आहेत. समाजातील संवेदनेचा प्रवाह तिकडे वाहू लागलाय हे खरे आहे. पण हे पाझर, प्रवाह अत्यंत क्षीण आहेत. दुधाचा महापूर, सामाजिक वनीकरण,

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...५३