पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकदा प्रतिकात्मक राखी बांधून येथील बालकांची जबाबदारी घेतल्यास धन्यता मानणारी महिला मंडळे या मुलांच्या जीवनात बरंच काही आशेची पालवी निर्माण करतात का? या सर्व प्रश्नांची निखळ उत्तरे समाजाने शोधायची वेळ येऊन ठेपली आहे.
 आपणाला या अनाथ, निराधार बालकांसाठी निरपेक्ष व अप्रसिद्धपणे किती तरी करता येण्यासारखे आहे. त्यांचे पालकत्व ही केवळ शासनाची बांधिलकी नाही तर तुमची-माझी पण आहे. आपण आपल्या उत्पन्नाचा काही भाग या मुलांसाठी देऊ शकतो. आपला थोडा वेळ जरी या मुलांसाठी दिला तरी या मुलांच्या आयुष्यात क्रांती होऊ शकते. बालगृहासारख्या संस्थांना तुमच्या पैशाची जशी गरज असते तशीच तुमच्या प्रेमाची पण. संस्थेतील मुले- आपणांपैकी कुणाला तरी काका, मामा, ताई, मावशी म्हणण्यास आसुसलेली असतात. संस्थेच्या पाळणाघरात नुसते पौष्टिक आहार देऊन, पाजून अर्भके मोठी होणार नाहीत. त्यांना गरज असते मातेच्या उबेची. मामाच्या गावाला जाऊ या' ‘आई आई ये इकडे' असे लाडिकपणे गाणे म्हणणारी ही मुले न येणाच्या आईची जशी वाट पाहतात, तशीच नसलेल्या मामाच्या घरी जाण्याची स्वप्नेही पहात असतात. चुकून चोरी केलेला मुलगा समाज आणास क्षमा करेल म्हणून किती आशेने वाट पहात असतो. बलात्कारित भगिनी अहिल्या उद्धाराच्या कथेप्रमाणे रामाची प्रतीक्षा करत असते. येथील प्रत्येकाची स्वतंत्र अशी व्यथा असते. प्रत्येकाचे जीवन म्हणजे एक हृदयद्रावक कादंबरी असते. आपण क्षणिक अश्रू ढाळून त्यांच्या जीवनात बदल होणार नाही. बालगृहासारख्या संस्था उपेक्षितांची मुक्तांगणे बनायची असतील तर आपला प्रत्येक हात या संस्थेसाठी सतत राबत, राहिला पाहिजे. आपले मन नेहमी या मुलांच्या चिंतेत गुंतायला हवे.

 बालगृहासारख्या संस्था समाजात असणे, हे कोणत्याही देशासाठी भूषणावह नाही. अनाथ, निराधार, बालगुन्हेगार मुले, मुली, समाजच निर्माण करतो. या मुलांचे अंतिम घरही समाजच असायला हवे. बालगृहासारख्या संस्था ह्या निर्वासित छावणीसारखी तात्पुरती व्यवस्था आहे. या संस्थांची समाजात गरज राहणार नाही, तो दिवस सोन्याचा मानावा लागेल. हे काही दिवास्वप्न नाही. गेल्या वर्षी युरोपातील अशा संस्था पाहण्याचा मला योग आला. आपल्याकडील या संस्थांचे

५२...उपेक्षित बालकांची मुक्तांगणे : बालगृहे